रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबेत गावाचे सुपुत्र बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते.
मुंबई विद्यापीठ व लंडन येथून कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी बॅरिस्टर हि पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या राजकारणात ते १९६२ पासून कार्यरत झाले. १९६२ ते १९७६ श्रीवर्धन मतदार संघात ते आमदार राहिले त्यादरम्यान त्यांनी राज्यात मंत्रिपदेही भूषवली होती. १९७६-१९८० राज्यसभा सदस्य झाल्यानंतर ते पुन्हा १९८० साली विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले.
बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री कसे झाले?
महाराष्ट्र राज्याचे पहिले व एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री अशी ओळख करणे कदाचित त्यांच्यवरती अन्यायकारक ठरेल. त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि त्यांच्या कार्यामुळे ९ जून १९८० साली ते मुख्यमंत्री पदावर पोहोचले होते.
ना सहकारी बँक, कोणती संस्था, साखर कारखानदार, सह्कारसम्राट कोणीही पाठीवरती नसताना कोकणातून आलेले अंतुले मुख्यामंत्री होणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यावेळेस मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान होत असत. तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे ते मुख्यमंत्री बनले.
आणीबाणीच्या काळात देशाचं राजकारण बदललं होत त्यातच इंदिरा गांधींविरोधात संतापाची लाट पसरली होती. यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी या अस्सल काँग्रेसी नेत्यांनीसुद्धा इंदिरा गांधींची साथ सोडली अनेकांनी पक्षबदल केले. परंतु मोजकेच नेते इंदिरा गांधींसोबत काँग्रेसमध्येच राहिले त्यापैकी अंतुले हे होते.
अशाप्रकारे अंतुले शेवटी मुख्यमंत्री झाले:
आणीबाणीच्या काळानंतर १९८० साली जनता सरकारचा प्रयोग फासून इंदिरा गांधींचे सरकार आले. त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या आणि देशातील काँग्रेस नसलेल्या राज्यांमध्ये सरकार बरखास्त केली. महाराष्ट्र राज्यातही राष्ट्रपती राजवट लावून तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार व पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार बरखास्त केले.
काही महिन्यांतच राज्याची निवडणूक होऊन काँग्रेसला बहुमत मिळालं. स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली. त्यावेळेस अंतुलेंसोबत वसंतदादा पाटील, प्रतिभा पाटील यांची नवे चर्चेत होती. परंतु इंदिरा गांधींनी ए. आर. अंतुले यांना मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केले आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी संजय गांधी यांनी पुढाकार घेतला होता.
अंतुले संजय गांधींचे विश्वासू सहकारी होते. ९ जून १९८० ला अंतुलेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि १५ दिवसांतच संजय गांधी यांचे निधन झाले. त्यास अनुसरून अंतुले यांनी संजय गांधी निराधार योजना सुरु केली ती आजही योजना चांगली चालू आहे.
….आणि कुलाबाचे रायगड नामकरण झाले:
ए. आर. अंतुले धाडसी निर्णय घेत असत व तडफदार होते. इंग्रजी, हिंदी, मराठी आणि उर्दू अशा ४ भाषांवरती त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी एकदा निर्णय घेतला कि ते अधिकारी व प्रशासनाच्या मागे खंबीर उभे रहायचे.
रायगड जिल्ह्यावरती त्यांचे खूप प्रेम होते. शिवरायांचा ते खूप आदर करत असत तसेच हि भूमी आणि शिवरायांचा बराचसा काळ रायगडमध्ये गेला होता म्हणूनच त्यांनी कुलाबाचे नामकरण रायगड असे केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनहून आणण्याची घोषणाही त्यांनी केली होती.
मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द २ वर्षेच राहिली पण एकूण राजकीय व मुख्यमंत्री कारकिर्दीत यांनी अनेक धाडसी आणि गरजेचे निर्णय घेतले होते:
- राज्य पोलीस दलातील चतुर्थ श्रेणीतील पोलिसांच्या गणवेशात फुल पॅन्टचा समावेश केला.
- संजय गांधी निराधार योजना सुरु करून गरजू लोकांना पेन्शन चालू केली.
- १९८० पूर्वी कीर्तनांचा सांस्कृतिक पुरस्कारात स्थान नव्हते ते अंतुलेंनी पुढाकार घेऊन कीर्तनाला यात स्थान दिले.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय त्यांच्या काळापासून सुरु झाला, त्यासाठी ते रिझर्व्ह बँकेसोबत भांडलेदेखील होते.
- राज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची ८०० स्मारके उभारली.
- मंत्रालयाच्या स्वागत कक्षात शिवरायांचे तैलचित्र लावले.
- मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार हा त्यांनी सुरु केला.
- रायगड जिल्ह्यात अनेक विकासकामे त्यांनी केली. रेवदंडा-साळाव ब्रिज, गोरेगाव-श्रीवर्धन खाडीवरचा पूल त्यांच्यामुळेच झाला.
- पूर्वी म्हसळा-श्रीवर्धन भागात जाण्यासाठी १०-१२ तास लागत असे परंतु अंतुलेंनी बांधलेल्या पुलामुळे ४ तास प्रवासाला लागू लागले.
- १६ ऑगस्ट १९८२ रोजी अंतुले यांनी उस्मानाबादचे विभाजन करून लातूर हा नवा जिल्हा निर्माण केला. तसेच रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा नवा जिल्हा निर्माण केला.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का द्यावा लागला:
मुख्यमंत्री होताच अंतुलेंनी कामाचा धडाकाच लावला होता. त्यांनी काही ट्रस्टची स्थापना केली होती त्यापैकी एका ट्रस्टचे नाव होते ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’. या ट्रस्टसाठी निधी गोळा केले जात असत.
३१ ऑगस्ट १९८१ साली इंडियन एक्सप्रेसच्या अंकात संपादक अरुण शौरी यांनी एक लेख प्रसारित केला. त्यात त्यांनी नमूद केले होते कि ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ या व इतर ७ ट्रस्टसाठी ३० कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आला होता त्या बदल्यात निधी देणाऱ्या कंत्राटदारांना सिमेंटची उपलब्धता आणि नवीन कंत्राटे देण्यात येत आहेत.
राम जेठमलानी यांनीसुद्धा एकही रुपया न घेता अंतुलेंविरोधात केस लढवली. इंदिरा गांधींचे नाव ट्रस्टला होते त्यात हा मुद्दा संसदेत गाजला तसेच मोठ्या प्रमाणात अंतुलेंविरोधात दबाव वाढला. त्यामुळे इंदिरा गांधींना अंतुलेंचा राजीनामा घेणे भाग पडले. जानेवारी १९८२ साली त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
हि केस १६ वर्षे चालली आणि ठोस पुराव्यांअभावी ए. आर. अंतुले निर्दोष सुटले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आजही रायगडमधील जुनी जाणकार लोकं सांगतात कि अंतुले जास्त काळ मुख्यमंत्री राहिले असते तर रायगड आणि कोकणचा विकास मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत झाला असता.