ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह सर्व महानगर पालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून ही संचारबंदी लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीमार्फत संवाद साधला.



तसेच पर्यटकांची वाढती संख्या आणि इंग्लंडमधील करोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही ५ जानेवारी २०२१ पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.
  
यावेळी सर्व जिल्हाधिकारी यांना स्थानिक परिस्थितीनुसार रात्रीची संचारबंदीबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.



इथे येणारे पर्यटक हे प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महानगरातील आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार:



मुरुड जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठी सध्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. गर्दीचे नियोजन करणे कठीण जात आहे. त्यामुळे रविवार, दि. 27 डिसेंबरपासून जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद ठेवले जाणार आहेत. पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतरच किल्ल्याचे दरवाजे पुन्हा पर्यटकांसाठी उघडण्यात येणार आहेत.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version