केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण नुकतंच संपलं. त्यांनी भाषणात अनेक मुद्दे मांडले. कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या वस्तू महागतील हे जाणून घेऊया.
मोबाइलच्या सुट्ट्या भागांवर 0 टक्के कस्टम ड्युटी होती ती आता २.५ टक्के वाढवण्यात आल्याने मोबाईल फोन महागण्याची चिन्हं आहेत. सोलर इन्व्हर्टरवरची ड्यूटी वाढवून 20 टक्के करण्यात आली आहे. निवडक ऑटो पार्ट्सवरची ड्युटी वाढवण्यात आली आहे. कापसावरील कस्टम्स ड्युटी वाढवून 10 टक्के केली.
- अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नाशिक मेट्रो फेज-१ आणि नागपूर मेट्रो फेज- २ ची घोषणा करण्यात आलेली असून २ हजार ९२ कोटी नाशिकसाठी आणि ५ हजार ९७६ कोटींची तरतूद नागपूरसाठी करण्यात आली आहे.
- तसेच ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आलेली असून पण कोणताही दिलासा सामान्य करदात्यांना देण्यात आलेला नाही.
- विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांच्या विशेष योजना
- पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ होणार इकॉनॉमिक कॉरिडॉर
- रेल्वेसाठी विक्रमी 1,10,055 कोटींची तरतूद
- रेल्वेसाठीच्या तरतुदीतले 1,07,100 निव्वळ भांडवली खर्च
- सोन्याच्या खरेदी-विक्रीसाठी मोठी घोषणा – SEBI ठेवणार व्यवहारांवर लक्ष
- कोरोना लशीसाठी (Corona vaccine)सरकारने 35 हजार कोटी रुपयांची तरतूद
- आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 886 कोटींच्या निधीची तरतूद
अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी एलआयसीबाबत महत्वाची घोषणा केली आहे. एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल, असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. सध्या एलआयसीकडे 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.
एलआयसी आणि आयडीबीआय मधील निर्गुंतवणुकीमधून सरकार 90 हजार कोटींचा फंड उभा करण्याच्या विचारात आहे. तर इतर काही कंपन्यांबाबत देखील निर्गुंतवणूक करण्याचा विचार सरकार करत आहे.
आयडीबीआय बँकेसोबतच अन्य दोन सरकारी बँकांचे खासगीकरण होणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली आहे.