आमचे Raigad Explore चे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



आम्हा महाडकरांना पुराचे काही अप्रुप नाही. ‘नेहमीच येतो पावसाळा‘ या उक्तीप्रमाने, नेहमीच येतो पुर त्यात कशाला कुरकुर
म्हणुन 21/7/2021 वार बुधवार रोजी सतत पडत असलेल्या पावसामध्ये रोजचा दिनक्रम महाडवाशी अगदी सहज पार पाडत होते. समोर येणाऱ्या संकटाची तशी कल्पना होती, पण हे संकट येवढं आक्राळ विक्राळ असेल याची तसुभरही कल्पना नव्हती.



हा दिवस तसा पावसाच्या रिपरिपीमध्ये निघुन गेला पण काही ठिकाणी पाणी साचायला सुरूवात झालीच होती. हावशी विर दुपारी पाणी पहायला पुराच्या पाण्यातही उतरले होते.


22 तारखेला दिवसभर पडणाऱ्या पावसाने तसं नेहमीसारखं पुराचं स्वरूप घ्यायला सुरूवात केली होती. नेहमीप्रमाणे महाडमध्ये गुडघाभर किंवा जास्तीत जास्त कमरेच्या वरपर्यंत, घराच्या वरच्या पायरीपर्यंत किंवा बैठ्या घरापर्यंत पाणी येईल अशा चर्चा सुरू झाल्या. दिवस हळुहळु सरकु लागला, पावसाचा जोर वाढु लागला. कामावर गेलेले घराकडे परतु लागले. रस्यावरचे वाढणारे पाणी , पार्किंग मधील पाणी पाहुन सालाबादप्रमाने दुचाकी, चारचाकी वाहने सुरक्षित म्हणजे जिथे नेहमी पाणी येत नाही अशा ठिकाणी म्हणजेच चवदार तळे, पेट्रोल पंप शिवाजी चौक येथे हलवण्यात आली.


बैठ्या घरांनी गरजेचे साहित्य पोट माळ्यावर हलवले, बाजारपेठेतील दुकानांनी बांधाबांध करून साहित्य शक्य तेवढ्या उंचावर ठेवण्याचा प्रयत्न केला. दिवस मावळत होता पण पाऊस काही थांबत नव्हता त्यात महाबळेश्वर, पोलादपुर भागात पडनार्या जोरदार पावसाच्या बातम्या येऊ लागल्या, अजुबाजुच्या धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याच्या बातम्या येऊ लागल्या, तळीये याठिकाणी दरड कोसळुन अनेक घरे त्याखाली गाडली गेल्याची बातमी येऊन धडकली.



आकले, बिरवाडी, राजेवाडी येथील घरे वाहुन गेल्याची वार्ता समजली. बापरे! आता किती आणि काय पहावे लागणार होते देव जानो. दिवस मावळला नेहमी पेक्षा पाणी वाढले आणि आमचा जगाशी संपर्क तुटला, लाईट गेली, फोनचे नेटवर्क गायब . पाण्याचा वेग वाढला, भयावह लाटा बिल्डिंग च्या भिंतीना येवून धडकू लागल्या.

आम्ही दुसऱ्या मजल्यावरून येणाऱ्या पाण्याचे रौद्ररूप पहात होतो. काळजाचा थरकाप होत होता. बघता बघता पाणी दहा फुट, पंधरा फुट वर चढत गेले बॅटरीच्या उजेडात धडकणाऱ्या लाटा आणखीनच भयानक भासत होत्या, लाटांच्या आवाजाबरोबरच बैठ्या घरातील माळ्यावरून वाचवा _वाचवा, हेल्प – हेल्प आवाज मस्तकाला झिनझिन्या आणणारा, लहान मुलांच्या किंकाळ्या काळजातून विजेचा प्रवाह जावा आणि पुर्ण देह निर्जिव व्हावा अशा भासत होत्या, मध्येच गायीचे केविलवाणे हंबरणे, काय करावे काही सुचत नव्हते. सर्व बाजुनी आकाश फाटले होते, त्यातील होता नव्हता तेवढा जलसाठा जणू धरतीच्या एकाच तुकड्यावर कोसळत होता.

सावित्री, गांधारी, काळ या तीन बहिणींनी हातात हात घालून पुर्ण महाडभोवती अक्षरशः तांडव चालवला होता.

डोळ्यासमोर महाडचे एक एक अंग सरकत होते संपुर्ण बाजारपेठ आता पुर्ण बुडाली असणार यात शंकाच नव्हती. सरेकर आळी, तांबट भुवन, कुंभार आळी, नवेनगर, प्रभात कॉलनी येथील सर्व बैठ्या घरांची स्थितींचा विचार करूनच अंगाचा थरकाप उडत होता. आमच्या घरा समोरचे वीस फुटी घर संपुर्ण पाण्यात बुडाले, कौले अलगत पाण्याबरोबरो वाहुन जाऊ लागली, त्यातील पुर्ण कुटुंबाने आधिच शेजारच्या बिल्डिंगचा आसरा घेतला होता पण घरातील प्रत्येक वस्तु त्यांचा पुर्ण संसार त्या पाण्यामध्ये शेवटच्या घटका मोजत होते.

काकरतळे परिसरात हाहाकार माजला होता. बिल्डिंग वरून दोरखंड घरावर सोडण्यात आले माळ्यावर जीव मुठीत घेऊन बसलेल्या कुटुंबाना पत्रा फोडून वर काढण्यात यश आले. देवाचे उपकार म्हणुन एका_एका घरातील सात_आठ व्यंक्तीना काढता आले.काळोख वाढत होता आणि पाण्याचा तांडव सुद्धा वाढत होता, पाण्यातून मोठ मोठाले ओंडके वाहत येऊन भिंतिंवर आदळत होते, इमारत कोसळणार नाही ना? या विचाराने जगण्याची आशा मनाने सोडूनच दिली.

डोळ्यादेखत समोरच्या इमारतीच्या संरक्षक भिंती कोसळताना पहात होतो. पाण्यातून कित्येक जणांचे संसार वाहत येताना दिसत होते. कानावर शिट्यांचे आवाज येऊ लागले ही एन डी आर एफ ची टिम होती ती सुद्धा बोटीने मदत कार्य करत होती. त्यामुळे थोडे हायसे वाटत होते. आमच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येताना दिसताच. सगळेजन कंबर कसून पहिल्या मजल्यावरील सर्व कुटुंबांचे सामान आता वरती हालवायचे या पवित्र्यात होतो . सामानाची बांधाबांध सुरू झाली, बाहेर पाऊस आता थांबला होता म्हणुन आम्ही पायरीवरील पाण्याची पातळी पाहु लागलो.

रात्रीचे दोन वाजले होते, आता पाणी स्थिर होते. पण पावसाचा काही भरवसा नव्हता. डोळ्यात तेल घालून त्या वैरी रात्रीला आम्ही साथ देत होतो. दोन हजार पाच सालचा पुर आठवत होता. त्याच्या पेक्षा हे पाणी किती तरी पट जास्त होते. तेंव्हाही महाड उध्वस्त झाले होते. पण आता! उद्याची सकाळ काय दाखवणारी होती ही कल्पना अंगावर काटा आणत होती. मध्य रात्रीनंतर पाणी ओसरू लागले.

23 तारखेला दुपारपर्यंत बहुतेक पाणी ओसरले आणि मागे राहिली भयान शांतता. बिल्डींगखाली गुडघाभर चिखल, रस्त्याच्या दुसर्या बाजूला काल केविलवाने हांभरणार्या गाईचा भलामोठा निष्प्राण देह, समोरचे कोसलळलेले घर, आणि वाहुन आलेलं बरच काही. ही फक्त आमच्या बिल्डिंगखालची स्थिती होती पुर्ण महाड मध्ये काय स्थिति असेल? जीव कावरा बावरा झाला, मोबाइल बंद माहिती कशी मिळणार? सर्व ओळखीचे चेहरे, दुकानदार, भाजीविक्रेते, मित्रपरीवार सारं सारं समोर येऊ लागलं. हळुहळु थोडी _थोडी माहिती कानावर येऊ लागली. नशिबाने महाड शहरात जिवितहानी झाली नाही. जागोजागी माणसाने माणसातील माणुसकीचे दर्शन घडवले होते.

जिवावर उदार होऊन अनेकांनी अनेकांना वाचवले होते.पण अरेरे! तळीये गावची दरड मनाला चटका देऊन गेली. अनेक कुटुंब दरडी खाली सापडली होती. 84 जनांनी आपले प्राण गमावले होते, त्यात आमचे पाच शाळकरी बछडे सुद्धा होते. राजेवाडीतुन, बिरवाडीतुन काही व्यक्ति गायब झाल्या होत्या. कित्येक प्राण्यांनी जलसमाधी घेतली होती.

जवळच्या अनेक शहरातून महाड कडे मदतीचा हात सरकत होता. धान्य, कपडे, जिवन आवश्यक हरेक गोष्ट महाड मध्ये पोहचु लागली.महाड नगरपालिकेचे कर्मचारी कंबर कसून कामाला लागले होते, जवळच्या शहरातील सर्व समाजसेवक जातिने महाड स्वच्छता मोहिमेमध्ये उतरले होते ही संख्या जवळ जवळ दहा हजारावर होती, मी या मानवता धर्माला खरोखर नतमस्तक झाले, रायगड जिल्ह्यातील कित्येक तालुक्यातील शिक्षक बांधवांनी मदतीचे हात सरसावले, यातच तिसर्या दिवशी आमच्या सरांच्या डी एड सवंगड्यांनी महाडवासियांसाठी मदत नव्हे कर्तव्य समजून पन्नास हजाराच्या जिवन आवश्यक वस्तुंचे किट पनवेल वरून आणले, आणि माझ्या भुमिची स्थिति पाहाण्याची माझी इच्छा पुर्णत्वास गेली.

प्रत्यक्ष ज्यांना मदतीची गरज आहे अशा ठिकाणी आम्ही या सारस्वतांना घेऊन जाणार होतो. पण रस्त्या वरून चिखल कापत जाताना मनाला पिळ पडत होता, डोळ्यातून नकळत अश्रु झरत होते. कष्टातुन उभे केलेले व्यवसाय आज चिखलात बुडाले होते. एकेकाळजी समृद्ध बाजारपेठ लगद्यानी लगडली होती. धान्यांचे ढिग सडत होते, कपड्यांची दुकाने ओळखू येत नव्हती प्रत्येक दुकानाबाहेर मोडलेले फर्निचर चिखलानी बरबटलेली होती, मशिनरी उलट पालट झाली होती. लाख्खो रूपयांच्या गाड्या चित्र-विचित्र अवस्थेत पडल्या होत्या. आता काय? हे समोरच्या प्रत्येकाच्या चेहर्यावरील दुखः बरच काही सांगत होते.

याहीपेक्षा दयनीय स्थिति बैठ्या घरांची झाली होती कुणाच्या भिंती पडल्या होत्या, कुणाचे आढे कोसळले होते, घरा मध्ये चिखलाचे साम्राज्य होते त्यात संसार कुठेच नव्हता. आणलेली मदत प्रत्येकाच्या हातात देऊन त्यांना धिर देऊन आम्ही पुढे सरकत होतो.

आज पुरानंतरचा दहावा दिवस विना लाईट विना नेट दहा दिवस फक्त महाड ची दयनियता पाहाण्यात गेले.लवकरच महाड पुर्ववत होईल,सर्व बाजुनी महाडला होणारी मदत वाखानन्याजोगी आहे. आज लाईट आली आहे पण तो, त्या रात्रीचा अंधार मनावर एवढा काळोख करून गेला आहे की आजच्या उजेडाची सुद्धा भिती वाटते आहे. हे का झाले? कुणा मुळे झाले? हा संशोधनाचा विषय आहे. पण निसर्गाने खूप मोठी चपराक महाड करांना लगवली आहे हे ही तेवढेच सत्य आहे.

सावित्रीमाय येऊन गेलीस
एक रात राहुन गेलीस
उघड्या बोडक्या भिंती मध्ये
चिखलाचं दान देऊन गेलीस.

कधी काळी तहान तु भागवली
तनाबरोबर मनाचिही स्वच्छता सुद्धा केली
किती ऊर भरून यायचा
गोडवे तुझे गाताना
माये काय म्हणु तुला आता
भिकेकंगाल होताना

डोळ्यादेखत माझ्या तु
पुरा संसार वाहुन नेलास
संपवायचं होत सर्व काही
जीव का मागे ठेवलास?

भकास माझ्या डोळ्यामध्ये
पुन्हा एकदा येऊन जा
धाय मोकलुन रडू दे
अश्रू थोडे देऊन जा.

गेलेल्या संसारासाठी
मनभरून रडून घेईन
कंबरेला गाठ बांधुन
बघ पुन्हा उभा राहिन.

लेखन सौ. उषा सचिन खोपडे, महाड, काकरतळे निर्मिती निसर्ग आपार्टमेंट

(आपण महाडमधील असाल आणि आपल्यालाही स्वतःचा अनुभव जगसमोर मंडायचा असेल तर आम्हांला मेसेज किंवा कमेंट मधून कळवा आम्ही वेबसाईटवरती पब्लिश करून जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहोचवू – Raigad Explore Team)


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version