२३ ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिन. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा आवडता खाद्यपदार्थ. मुंबईतील काही लोकांचा तर नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा मेनू हा वडापाव ठरलेला असतो. दादरमध्ये पहिल्यांदा वडापाव सुरु झाला तेव्हा तो १० पैशात मिळायचा आता तो काही ठिकाणी १०० रुपयांनासुद्धा मिळतो.
सर्वेनुसार मुंबईत दिवसाला १८ ते २० लाख वडापाव खाल्ले जातात, त्यावरून तुम्ही समजू शकता हा पदार्थ किती महत्वाचा आहे.
मी पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये गेलो तेव्हा किचेनमधील सामान आणेपर्यंत सुरुवातीचे ४-५ दिवस पिझ्झा आणि बर्गर खाण्यातच घालवावे लागले. जेवण काहीच बनवता येत नव्हते. पाश्चात्य फूड खाऊन वीट आला होता म्हणून युट्युब पाहून काहीच नाही त्यापेक्षा खिचडी भात शिकलो. मग काय तिन्ही वेळेस फक्त खिचडी भातच.
नवीन ओळखी वाढल्या त्यामध्ये बहुतांशी आशियाई आणि इंग्लंडचे-युरोपचे लोक कामाच्या ठिकाणी मिळत होते. त्यातच अचानक माझी ओळख झाली माझा मित्र चिरंतन सहस्रबुद्धे, जो लहानाचा मोठा इंग्लंडमध्येच झाला पण आई-वडील मूळचे पुण्याचे. आम्ही दोघेही शाकाहारी आणि आमची राहण्याची ठिकाणेसुद्धा जवळच त्यामुळे त्याने आणलेले घरचे जेवण खऱ्या अर्थाने भूक भागवत होते.
आपण अशा ठिकाणी असतो जिथली संस्कृती आपल्यापेक्षा खूप वेगळी असते. ज्यामध्ये राहणीमान, जेवण सर्व वेगळेच. आपल्या शरीराला सवय नसलेले पदार्थ आपण जास्त काळ खाऊ शकत नसतो मग आपल्याला घरच्या जेवणाची आणि आपल्या खाद्यसंस्कृतीत बसणाऱ्या पदार्थांची प्रकर्षाने आठवण किंवा उणीव जाणवत असते.
चिरंतनने मला लंडनमध्ये श्रीकृष्ण वडापाव याठिकाणी नेले आणि मी क्वचितच वडापाव खाणारा त्यादिवशी वडापाव अगदी जेवण म्हणून जेवलो.
श्रीकृष्ण वडापावचे मालक मूळचे पुण्यातलेच, पण इंग्लंडमध्ये येऊन त्यांनी उत्कृष्ट वडापाव, मिसळ आणि पावभाजीची छोटे हॉटेल टाकून माझ्यासारख्या कामानिमित्त किंवा स्थायिक भारतीय लोकांच्या जिभेचे चोचले पुरवले आणि अजूनही कोरोनाच्या महामारीत ते उत्कृष्ट दर्जाचे शुद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ कमीतकमी दरात पुरवत आहेत.
लंडनमध्ये असूनसुद्धा वडापावसोबत ब्रेड न देता पारंपरिक व्हाईट पाव येथे दिला जातो. तिथल्या अनुषंगाने एक वडापाव हा खुप स्वस्त दरात दिला जातो म्हणजेच एक पाउंड (भारतीय चलनात साधारण १०० रुपये एक वडापाव). वडापावप्रमाणेच इतर अस्सल महाराष्ट्रीयन व भारतीय पदार्थ कांदाभजी, बटाटाभजी, दाबेली, समोसापाव, पावभाजी इत्यादी याठिकाणी पुरवले जातात.
छोट्या टपरीपासून ते मोठ्या मॉलमध्येसुद्धा मिळणाऱ्या वडापावचे वेळेनुसार तसेच ठिकाणानुसार महत्व खूप मोठे आहे आणि उपकारही. आपला वडापाव हा जागतिक दर्जाचा पदार्थ आहे त्यामुळे इतर भारतीय पदार्थांप्रमाणे वडापावचे महत्व सुद्धा खूप मोठेच आहे.
लेख: आस्वाद अनंत वारे, रायगड
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर ।
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी तसेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group