कॅलिफोर्निया-अमेरिका येथे पार पडलेल्या एसएई इंटरनॅशनल एरो डिझाईन चॅलेंज 2022 वेस्ट या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील शहापूरचा सुपुत्र रतिश संतान पाटील याने पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांतून ‘गरुडाश्व’ या एरोनॉटिकल टीममध्ये डिझाईन डिपार्टमेंटचे नेतृत्व केले. या स्पर्धेत त्याने केलेल्या वणवे विझविण्यासाठी पाणीवाहू विमानाच्या केलेल्या डिझाईनमुळे जागतिक स्तरावर भारताला प्रथम क्रमांक मिळाला. या त्याच्या डिझाईनमुळे जगभरातील जंगलांना लागलेले वणवे रोखण्यासाठी मदत होणार आहे.
शहापूर येथील संतान सुदाम पाटील व यशोदा संतान पाटील या दांपत्याचा रतिश हा पुत्र असून तो ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे येथे मेकॅनिकल शाखेत तिसर्या वर्षात पदवी घेत आहे. एरोनॉटिकल या क्षेत्रात त्याचे विशेष प्राविण्य आहे. दिनांक 8 ते 12 एप्रिल 2022 ला एसएई इंटरनॅशनल एरो डिझाईन चॅलेंज 2022 वेस्ट ही स्पर्धा कॅलिफोर्निया, अमेरिका येथे पार पडली.
या स्पर्धेत जगातील 70 देशाच्या विद्यापीठांचा समावेश होता. त्यात भारतातील पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस) अभियांत्रिकी महाविद्यालयातून ’गरुडाश्व’ या एरोनॉटिकल टीममध्ये डिझाईन डिपार्टमेंटचे रतिश संतान पाटील याने नेतृत्व केले.
रतिश पाटील याने 12 फूट लांबीचे रेडिओ कंट्रोल्ड विमानाचे डिझाईन केले. हे विमान बॅटरी पॉवरने चालणार असून ट्रान्समीटरद्वारे त्याचे नियंत्रण करण्यात येणार आहे. या विमानाद्वारे जंगलातील वणवे विझवण्यासाठी पाण्याची वाहतूक करण्यात येणार आहे. एका फेरीत हे विमान 8 लिटर पाण्याची वाहतूक करु शकणार आहे. एक विमान बारा वेळा उड्डाण करुन 96 लिटर पाण्याची वाहतूक करुन जंगलातील वणव्यांवर पाण्याची फवारणी करुन आग नियंत्रित करण्यास मदत करु शकेल.
जागतिक पातळीवर 3 लिटर पाण्याची वाहतूक करणारी अशी विमाने आहेत. परंतु रतिशने 8 लिटर पाणी वाहून नेणार्या विमानाचे डिझाईन केल्यामुळे जागतिक पातळीवर आग विझविणार्या यंत्रणांसाठी ते वरदान ठरले आहे. त्याच्या या डिझाईनमुळे जागतिक स्तरावर भारताला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ग्रामीण भागातील रतिशने हे यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group