गुहेत राहणाऱ्या मनुष्य प्राण्याला जेव्हा प्रथम हिंस्र पशूंपासून संरक्षणाची गरज निर्माण झाली तेव्हा त्याने प्रथम झाकण किंवा दरवाज्याचा शोध लावला असावा. ज्या क्षणी माणूस आपल्या गरजेपेक्षा अधिक काही मिळवून संचय करायला लागला त्याक्षणी त्याला कुलुपाची गरज वाटू लागली असावी.

जगभर कुलूप आणि किल्ली या जोडीचा इतिहास, संचार आणि प्रसार खूप रंजक आहे. अवाढव्य विस्ताराची सूत्रे छोट्याशा चावीच्या रूपाने आपल्या खिशात हवीत हा विचार, कुलूप आणि किल्ली यांच्यात सतत होत गेलेल्या प्रगतीला कारणीभूत असावा. इजिप्तमध्ये एका राजप्रासादाच्या उत्खननात सुमारे २७०० वर्षांपूर्वीच्या लाकडी कुलुपाचे अवशेष सापडले आहेत. रोमन लोक आपले मौल्यवान सामान पेटाऱ्यामध्ये ठेवत असत आणि या पेटाऱ्याची किल्ली ते आपल्या बोटात अंगठीसारखी वापरत असत. अगदी आजसुद्धा वापरले जाणारे लिव्हर्सवर आधारित कुलुप हे १७७८ मध्ये रॉबर्ट बॅरोन याने शोधून काढले.

भारतामध्ये रामराज्यच होते. शनी शिंगणापूरसारख्या गावात घरांना कड्याकुलुपे तर सोडाच पण साधे दरवाजेही नाहीत. पण तरीही येथे कड्याकुलुपांची गरज होतीच. मृच्छकटिक नाटकातील शर्विलक तर मोठेच तत्वज्ञान सांगतो.पण अगदी सुरुवातीला एखादी साधी लोखंडी कडी किंवा लाकडी पट्टीसुद्धा चालत होती. नंतरच्या काळात हळूहळू घरांना, वाड्यांना कड्या आणि कुलुपांची गरज भासू लागली. आपल्याकडील हुशार आणि कसबी लोहार मंडळी, सहजासहजी तोडता येणार नाहीत अशी जाडजूड लोखंडी कुलुपे बनवू लागले. राजे आणि श्रीमंत मंडळी यांच्याकडून प्रोत्साहन मिळू लाग ल्यावर यात वेगाने विविध सुधारणा दिसू लागल्या.

माझ्या संग्रहातील विविध कुलुपे:

माझ्या संग्रहात अशी अनेक कुलुपे आहेत ज्यांची खरी किल्ली जरी मिळाली तरी त्या किल्लीने ते कुलूप,जर विशिष्ट क्लृप्ती माहिती नसेल तर उघडताच येणार नाही. न्यू साऊथ वेल्स रेल्वेने वापरलेल्या खेकड्यासारखे उघडणाऱ्या कुलुपाचे पेटंट नोंदणीचे १८४० हे वर्ष त्यावर नोंदलेले आहे. काही कुलुपांमध्ये किल्ली घालायला जागाच नाही. एका की होलवरील पट्टी सरकविली तर त्याखाली दुसरेच की होल सापडते.

एका कुलुपावर चक्क पहारेकऱ्याची मूर्ती असून तिच्या पोटात किल्ली घालून ते उघडावे लागते. कुलुपावरच पहारेकरी …. काय कल्पना आहे ! दुसऱ्या एका कुलुपावर काही क्रमांक असलेली चकती आहे. या चकतीवरील काही क्रमांक जुळविल्यावर तुम्हाला त्याखाली असलेले की होल उघडता येते आणि नंतर किल्लीने कुलूप उघडता येते.

हल्ली आपण किल्लीच नसलेले आणि केवळ कांही क्रमांक जुळवून उघडले जाणारे कुलूप पाहतो. याचा पूर्वज माझ्या संग्रहात आहे. त्यावरील L O V E ( लव्ह ही इंग्रजी अक्षरे ) ही चार अक्षरे जुळविली की ते कुलूप उघडते.

माझ्याकडील १९४८ च्या एका कुलुपावर गांधीजींची स्मृती म्हणून त्यांची छबी आणि ‘ बापू ‘ ही हिंदी व इंग्रजी अक्षरे पाहायला मिळतात. घराच्या पहाऱ्यावर खुद्द बापूजींनाच बसवायचे म्हणजे, काय म्हणावे ? … आणखी एका कुलुपामध्ये तंत्रज्ञानाचा आधुनिक आविष्कार पाहायला मिळतो. या कुलुपाला ३ किल्ल्या आहेत. वेगवेगळ्या स्तरावर एकेक किल्ली लावून चौथ्या स्तरावर हे कुलूप उघडते. हे कुलूप उघडणे म्हणजे एक मोठे कोडे सोडविण्यासारखे आहे. कसे उघडायचे हे माहिती नसेल तर सगळ्या किल्या हातात असूनही कुलूप उघडणे अशक्य होते.

युट्यूब किंवा अन्य माध्यमांवर हे कुलूप चक्क शिवकालीन असल्याचे ठोकून सांगितले जाते. पण ते खरे नाही. डॅम अँड लॅडविग या जर्मन कंपनीचे एक कुलूप १९०० सालचे आहे. आणखी एका कुलुपामध्ये आपण किल्ली घालून कितीही फिरविली तरी या कुलुपाच्या मागील बाजूला असलेली आणि पटकन लक्षात न येणारी कळ दाबल्या वाचून हे कुलूप उघडत नाही. एक आडवे पितळी कुलूपही असेच खास आहे. वस्तऱ्याच्या पात्यासारखी बंद होणारी पट्टी हीच या कुलुपाची किल्ली आहे एका कुलुपाची किल्ली तर दारूच्या बाटलीचा कॉर्क ओपनर असतो तशी आहे. शांती या कंपनीचे एक पितळी कुलूप ६ लिव्हर्सचे आहे.

या कुलुपाच्या दर्शनी भागावर ६ हा इंग्रजी अंक तीन ठिकाणी कोरलेला आहे. किल्ली फिरविताना या तीनपैकी एका विशिष्ट ६ अंकाच्या पोटातील सूक्ष्म गोल दाबल्याशिवाय कुलूप उघडणारच नाही.अशी सर्व जुनी कुलुपे ही वजनदार, फोडायला कठीण, कापायला फारच कठीण असायची.असेच एक गंमतीदार प्रकाराचे आणि आकाराचे एक कुलूप माझ्यापाशी आहे. हे कुलूप चक्क आपल्या पुण्याच्या शेख अँड कंपनी यांनी बनविले असून, त्यांनी त्याचे पेटंट घेतलेले आहे. ते ८ लिव्हर्सचे असून चक्क छोट्या हंडीच्या आकाराचे आहे. आता हे खूप कुलूप खूपच दुर्मिळ असून त्याची चावी सुद्धा अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे. याचे वजन १ किलोपेक्षाही अधिक आहे.

भारतात कुलुपांचा इतिहास हा अलिगढ आणि गोदरेज या दोन नावांशिवाय अपूर्णच आहे.अलिगढमध्ये अगदी मोगल काळापासून कुलुपांची निर्मिती केली जाते असे म्हणतात. या कुलुपांमध्ये सफाईदारपणा नव्हता पण ती इथली गरज भागविणारी होती.गोदरेज कंपनीने मात्र या कुलूपविश्वाची किल्ली अजूनही आपल्याच खिशात ठेवली आहे.खूप जाडजूड लोखंडी कुलुपांपासून ते सुप्रसिद्ध असे नवताल, क्रमांकांवर आधारित कुलुपे, कार्ड स्वाईप करून उघडायची कुलुपे,ज्याची दुसरी किल्ली बनविताच येणार नाही अशी कुलुपे असा प्रवास करीत करीत आता केवळ बोटांचे ठसे जुळल्यावर उघडणारी स्मार्ट लॉक्स आली आहेत.आधी माणूस निरक्षर होता.सही ऐवजी अंगठा वापरत होता.नंतर तो लेखन शिकला.आता बोटांच्या ठशांवर आधारित कुलुपे म्हणजे माणसाचा उलटा प्रवास म्हणायचा!

जेव्हांपासून कुलूप आणि किल्लीची संकल्पना अस्तित्वात आली तेव्हांपासून अगदी आजतागायत त्याची गरज जरादेखील कमी झालेली नाही. उलट त्याचा आवाका वाढला. क्षेत्र बदलले. स्वरूप बदलले. मोबाईलपासून ते कॉम्पुटरपर्यंत सर्वांना पासवर्ड आले. पासवर्ड म्हणजेच आभासी कुलूप आणि आभासी किल्लीच नाही का ? मनुष्य प्राण्याचा स्वभाव लक्षात घेता कुलूप किल्लीची गरज जगाच्या अंतापर्यंत राहणारच!

©मकरंद करंदीकर


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version