२००८ साली खारघर नवी मुंबई येथे ५१० एकराचा परिसर आणि सुमारे ४० लाखांहून लोक जमले होते ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा केली आहे.
निमित्त होत स्वर्गीय नारायण विष्णू धर्माधिकारी म्हणजेच नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार होते. त्यांचे सुपुत्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते स्वीकारला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले लोक याला साक्षीदार होते.
इतका मोठा कार्यक्रम, ४० लाखांहून अधिक लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून क्रुझर, सुमो, ST बस मिळेल त्या वाहनाने याची देही याची डोळा म्हणून हा कार्यक्रम पाहायला येणार होते. अनेक लोक परराज्यातून तसेच विदेशातूनसुद्धा येणार होते.
त्यामुळे बैठकीबद्दल ज्ञान नसणारे लोक निश्चितच एकप्रकारे असा कार्यक्रम झाला तर खूप कचरा होईल, ट्राफिक वाढेल अनेक इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून नावे ठेवत होती. परंतु बैठकीद्वारे दिलेले शिक्षण, शिस्त तंतोतंत पाळल्यामुळे पोलिसांवरचा भार खूपच कमी होता आणि जी लोक नावे ठेवत होती त्यांनी तर हि शिस्त पाहून तोंडात बोटे घातली.
कार्यक्रमाला आलेल्या जनतेने येताना आपल्यासोबत स्वतःचे जेवण-पाणी आणले होते आणि साधा कागदाचा तुकडा देखील रस्त्यावर दिसला तरी स्वतःच्या पिशवीत घेऊन मग कचऱ्यात टाकला.
नानासाहेबांचे कार्यच इतके महान होते कि अनेक लोकांना यायची इच्छा असून देखील या कार्यक्रमाला येता आले नाही.
जाणून घेऊया नानासाहेब धर्माधिकारी यांचे अमूल्य कार्य:
१ मार्च १९२२ साली नानासाहेबांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव ‘शांडिल्य’ होते परंतु ४०० वर्षांपासूनचा समाजप्रबोधनाचा वारसा होता आणि त्यांच्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य यांचे धर्मजागृतीचे काम स्वच्छेने आणि तळमळीने करायचे म्हणून त्यावेळी कान्होजी आंग्रे यांनी त्यांना ‘धर्माधिकारी‘ हि पदवी दिली. तेव्हापासून त्यांचे घराणे धर्माधिकारी असे नाव लावत आले आणि त्याच तळमळीने समाजप्रबोधन आणि समाजकल्याणाचे काम करू लागले.
नानासाहेबांनी आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेतली आणि प्रसिद्धीपासून दूर राहून ते समाजप्रबोधनाचे काम करू लागले.
नानासाहेबांच्या धर्माची व्याख्या:
हल्लीच्या काळात समाजकंटकांनी धर्माची व्याख्याच जणू बदलली आहे परंतु नानासाहेब जरी धर्मप्रचारक असले तरी त्यांचा धर्म म्हणजे ज्ञानदेवांचा, तुकोबारायांचा, नामदेवाचा, गाडगेमहाराजांचा, समर्थ रामदासांचा धर्म. संतप्रणीत आणि संतस्पर्शाने पवित्र बनलेल्या धर्माचे नानासाहेब वारकरी होते.
१९४३ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली आणि समर्थ रामदासांचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवत नेला. श्री समर्थांचा दासबोध ग्रंथ वाचला नाही तर त्या ग्रंथातील तत्वज्ञान ते घटाघटा प्यायले आणि जनमाणसाला आकार देण्यासाठी ते अधिक गतिमान झाले.
नानासाहेबांचे विचार जगभरात कसे पोहोचले:
पुण्य करावे करवावे । ज्ञान धरावे धरवावे ।
स्वये तरावे तारवावे । एकमेका ।।
या भावनेद्वारेच मन समृद्ध होते, मनाची कक्षा विशाल बनते आणि मोठया मनाचा माणूस स्व: किंवा स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार करते आणि शरीर न जोडता मनांनी समाज एकवटतो. हे शिक्षण आणि विचारांमुळे असंख्य लोक नानासाहेबांचे अनुकरण करू लागले आणि मग बनला श्रीसेवकांचा एक विशाल परिवार.
जग जवळ येत चाललेले परंतु त्यामुळेच पाश्चात्य संस्कृतीमुळे सेवा, त्याग, देशभक्ती, कर्तव्ये यांचा विसर पडत चालला होता माणूस स्वार्थी बनत होता, संचयी आणि व्यापारी बुद्धी वाढल्याने क्रूरता, अहंकार आणि लोभ वाढल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य नक्कीच बिघडत चालले होते.
नानासाहेब यांनी काळाची गरज ओळखली आणि स्वतः लोकदास बनून मानवधर्माची, विश्वधर्माची शिकवण देऊ लागले.
व्यसनमुक्ती आणि प्रपंच नीट करावा याबद्दल दिशा कशी दाखवली:
आपल्या भारतीय संस्कृतीत शरीरालाच मंदिर म्हटले आहे. मग जर शरीरच मंदिर आहे तर मग त्याची काळजी, पावित्र्य आणि वातावरण सुगंधित असणे गरजेचे आहे. स्वदेहाची पूजा केली तर नक्कीच वातावरण निर्मळ आणि सुगंधित राहील. या नानासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन लोक व्यसनापासून दूर होत गेले व प्रपंच नेटका होत गेला.
नानासाहेबांचे विचार आणि ज्ञान ऐकण्यासाठी लोक तिष्ठू लागले, रात्र-रात्र जागु लागले, नव्या युगातला रामदास पाहू लागले. माणुसकीची एकप्रकारे चळवळच उभी राहिली आणि माणसे मनाने जोडत गेली आणि माणसे खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगू लागली.
आज पण गावोगावी बैठकीचे अद्ययावत हॉल झालेले पाहतो, परंतु नानासाहेबांनी हे कार्य चालू केले तेव्हा ना धड रस्ते असायचे ना गाड्या ना संपर्काची साधने. तरीही त्यांनी निःस्वार्थाने जनसेवेचा पाया रचला आणि आज जगभरात बैठक होऊन ज्ञानाचा प्रसार वाढू लागला.
आज नानासाहेब आपल्यात नसले तरी त्यांचे पुत्र श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजप्रबोधनाची धुरा तितक्याच तळमळीने आणि निष्ठेने स्वतःच्या शिरावर घेतली आहे. स्वछता दूत म्हणून शासनाने त्यांना नेमले असून गावोगावी श्रीसेवक नियमित स्वच्छता आणि विचारांची देवाण घेवाण करत आहेत.
लेख कसा वाटला या संदर्भात आपली प्रतिक्रिया आणि अनुभव नक्की कळवा आणि लेख आवडल्यास शेअर जरूर करा!