suresh-sheth-salvi


तळा तालुक्यातील महागाव विभागातील जेष्ठ समाज सेवक, वरदायिनी विद्यालय महागावचे संस्थापक चेअरमन, व्यापारी व परोपकारी व्यक्तीमत्व ह. भ. प. कै. सुरेशशेठ साळवी यांचे दि. १०/९/२०२१ रोजी दु:खद निधन झाले.

कोण होते सुरेशशेठ साळवी?


रायगडमधील एक असे व्यक्तीमत्व जे कोणत्याही सुखसुविधा नसताना शाळा टिकावी, शाळेचा विद्यार्थी शिकावा, शिक्षक शाळा सोडून जाऊ नयेत म्हणून अनुदान मिळेपर्यंत तब्बल 14 वर्षे त्यांनी शिक्षकांचे पगार त्यांना लागणारे घरगुती सामान आणि शाळेला इमारत व साहित्य स्वतःच्या खर्चाने दिले. दहावीला विद्यार्थी पट कमी असताना स्वतः आपल्या मुलीसोबत दहावीच्या बोर्डाला विद्यार्थी म्हणून बसले

पितृछत्र लहानपणीच हरवले असताना देखील लहानपणापासून समाजसेवेचे व्रत हाती घेतले.. अनंत अडचणी असताना देखील त्याकाळी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. नोकरीत मन रमत नसताना सरकारमान्य रास्त भाव साखर व धान्य दुकानाचा परवाना मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरु केला. यशस्वी व्यवसायिक आणि यशस्वी शेतकरीसुद्धा झाले.

सलग १४ वर्षे विनाअनुदान तत्वावर टिकवून ठेवताना होणारा अतिरिक्त आर्थिक भार सोसत प्रत्येक अडचणीला खंबीरपणे सामोरे जात होते, त्यामुळे या पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थां वेगवेगळ्या उच्च पदावर पोहोचले आहेत. कित्येकांना प्रापंचिक आडचणीत मदतीचा हात पुढे करून त्याचे संसार वाचविले आहेत. केलेली मदत पुन्हा मिळेल अशी अपेक्षा कधी ठेवलीच नाही.

– श्री. कमलाकर मांगले (पो. पाटील महागांव व सुरेश साळवी यांचे भाचे)

गावी वीज नाही, पाणी नाही आणि गाडी येईल असा रस्ताही नाही आणि त्यावेळेस पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांचा सातवी नंतरच्या शिक्षणाचा प्रश्न होता, तो प्रश्न कै. सुरेशशेठ साळवी यांनी जाणला आणि स्वतःच्या हिंमतीवर वडिलोपार्जित जमीन दान करून आपल्या मित्रांच्या सोबतीने हायस्कुल सुरु केले. हायस्कुलला स्वतःचे नाव देताही आले असते… परंतु विद्यादानाचे मोठे कार्य आहे म्हणून त्यांनी ‘वरदायीनी विद्यालय महागांव’ नावाने हायस्कुल सुरु केले…

आत्ताच्या विद्यार्थ्यांना सुरेशमामांचे कार्य समजावे म्हणून दरवर्षी त्यांची जयंती साजरी करण्यात यावी व जयंतीनिमित्त करिअर गायडन्सपर शिबिरे भरवावीत व शाळेत विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील रहावे.

– श्री. सुनील बैकर (प्रा. शिक्षक व माजी विद्यार्थी)

महागावमध्ये ग्रामपंचायत सुरु झाल्यावर सरपंच होण्याचा मान असताना देखील त्यांनी आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या आपल्या साथीदार मित्राला मानाची खुर्ची कायम ठेवली. आज त्यांच्या परिवाराला अनेकांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संदेश येत असून त्यात ते सांगत आहेत गरजेला उधारीवरती दिलेल्या सामानामुळे त्यांचे सण तेव्हा सुरेशशेठमुळे साजरे झालेले आहेत.

त्यांनी सुरु केलेल्या विद्यादानामुळे आजपर्यंत 40 वर्षांत एकूण 40 बॅच शिकून बाहेर पडल्यात. त्यात अनेक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, उद्योजक आणि अनेक हुद्यावरती यशस्वी जीवन जगत आहेत. एखाद्या संस्थेचा संस्थापक किंवा चेअरमनचा रुबाब आणि राहणीमान कसे असेल या कल्पनेतून अनेकजण भेटीला येणारे नवीन लोक त्यांच्या साध्या राहणीमानामुळे अचंबित होत.

एस् एस् सी च्या परिक्षेत दरवर्षी पहील्या क्रमांकाने उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला कै.सुरेशशेठ साळवी यांच्या नावाने पुरस्कार देणार.

– श्री. चंद्रकांत राऊत (उपाध्यक्ष- इंदापूर विभाग शिक्षण प्रसार मंडळ)

सुरेश साळवी यांनी केलेल्या समाजसेवा, व्यवसाय व शिक्षणक्रांतीमुळे त्यांना शेठ, शिक्षणमहर्षी, सात गावचे दाता अशा अनेक नावांमुळे ओळखले जाऊ लागले, परंतु अखेरच्या श्वासापर्यंत ‘घ्यायचं’ म्हणून न जगता ‘द्यायचं’ म्हणूनच ते दुसऱ्यांसाठी जगले.

चेअरमन म्हणून आज तुम्ही असंख्य जागा-जमिनी, बंगले इमारती बांधू शकला असतात परंतु तुम्ही केलेल्या कार्यामुळे इतरांच्या मनात न ढसाळणाऱ्या इमारती बनविल्यात.

– अनंत ला. वारे (मा. गटसमन्वयक तळा व सुरेश साळवी यांचे जावई)

स्वखर्चाने शाळेची सुसज्ज इमारत त्यांनी १९८० च्या दशकात बांधली. या इमारतीच्या उदघाटनावेळी एक तरुण मुलगा या गोष्टी सहज करू शकतो याचे त्यावेळी तत्कालीन आमदार कै. अशोकदादा साबळे यांना देखील आश्चर्य वाटले. अनेकांचे विरोध व पोलीस केससुद्धा हसत-हसत अंगावर घेत असंख्य अडचणींवर मात देत त्यांनी आजपर्यंत वरदायिनी हायस्कुल महागाव सुरळीत चालू ठेवले. अशा या महान व दुर्लक्षित व्यक्तिमत्वास आमचा मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.