grampanchayat

रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींपैकी 78 ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत रायगडकरांचा सर्वच पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक 16 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवला आहे. भाजपविरोधात झालेल्या महाआघाडीने 13 तर शेकापने 11 ग्रामपंचायतींवर लाल बावटा फडकवला आहे.



88 पैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर माणगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये एकूण जागांपैकी काही जागी नामनिर्देशनपत्रे आली नाहीत, मात्र उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात 78 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. सोमवार १८ जानेवारी २०२१ रोजी या सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले.



पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात एकूण 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी 7 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. भाजपने पनवेलमध्ये नऊ आणि उरणमध्ये 1 अशा 10 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. भाजपचा प्रभाव फक्त उत्तर रायगडमध्ये पाहण्यास येत आहे.



श्रीवर्धन तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला असून सेनेने जिल्ह्यात 8 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. पेण आणि अलिबागमध्ये शेकापने जोरदार यश मिळवले आहे. पेणमधील शेकापच्या कार्यकर्त्यांनी 7 पैकी सहा ग्रामपंचायतींवर लाल बावटा फडकवला आहे. काँग्रेसनेही महाडमध्ये एका ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. दुसर्‍या ठिकाणी सेना, काँग्रेस आणि इतर असा संमिश्र निकाल आहे.



कोणत्या पक्षाने मिळवल्या किती ग्रामपंचायती?
राष्ट्रवादी – 16
शिवसेना – 8
भाजप – 10
शेकाप – 11
महाआघाडी – 13
संमिश्र – 19
काँग्रेस – 1


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.