mahad bridge collapsed incedent

मुसळधार पाऊस, दर्श अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्येचा दिवस, त्यामुळे मुंबई-गोवा हायवेवरती तुरळक ट्राफिक. दुसऱ्याच दिवशी श्रावण महिना चालू होणार होता. महाबळेश्वरमध्ये आदल्या रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे सावित्री नदीचे पात्र पाण्यामुळे वाढून पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड वाढला होता. साधारण रात्री ११:३०- १२:३० च्या दरम्यान पाण्याच्या प्रचंड वेगामुळे जुना ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला आणि तब्बल ४२ जणांचा यात नाहक बळी गेला.

आमावस्या असल्यामुळे चंद्राचा उजेड नव्हता, गर्द काळोख तसेच जोडीला मुसळधार पाऊस आणि समोरील येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटमुळे रस्ता व्यवस्थित दिसण्याचा काही संबंधच नव्हता. मुंबई-गोवा हायवेचे अजूनही दुपदरीकरणाचे काम चालू आहे त्यामुळे ४ वर्षांपूर्वी दोन पदरीच रस्ता. परंतु बिरवाडी फाट्यानजीक ब्रिटिशकालीन पूल अरुंद असल्यामुळे शेजारीच नवीन पूल बांधण्यात आलेला, ज्याचा टोल अजूनही लोक भरत होते. दोन पूल असल्यामुळेच फक्त याठिकाणीच येणारी-जाणारी वाहने वेगवेगळ्या पुलावरून जायची.

महाड येथील सावित्री नदीवरील कोसळलेला पूल

मुळात जुना पूल बंद करावा अशी मागणी आधीपासून होतच होती परंतु स्ट्रकचरल ऑडिटमध्ये पूल धोकादायक नव्हता व वाहनांसाठी खुला राहण्यात अडचण नाही म्हणून चालू होता. मध्यरात्री पत्त्यांसारखा कोसळावा असा पूल पाण्यासोबत वाहून गेला आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहने काही कळायच्या आत पाण्यात पडून वाहून जाऊ लागली. ज्या बाजूला पूल संपत होता तिकडे एक हॉटेल होते आणि शेजारीच छोटेसे टायर पंक्चर काढण्याचे दुकान. त्या दुकानात काम करणारे बसंत कुमार हे नुकतेच झोपण्याच्या तयारीत होते. जोरात वाहने आदळल्याचा किंवा स्फोट होत असल्याचे भास होत होते.

ते स्वतः तडक काळोखातून पाहण्यासाठी गेले आणि घटनास्थळी गेल्यावरती बसंत कुमार यांना समजले कि जो स्फोटासारखा आवाज आला तो पूल कोसळण्याचा आवाज होता. पुलाचा काही भाग कोसळलेला असून रत्नागिरीच्या बाजूने येणारी वाहने क्षणात पाण्यात वाहून जात आहेत. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नवीन पुलावरून दुसऱ्या बाजूला जाऊन येणाऱ्या वाहनांना इशारा करत होते कि कृपया थांबा पुढे पूल वाहून गेलेला आहे धोका आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वाहन चालकांना असे वाटत होते कि कोणीतरी लिफ्ट मागत आहे किंवा चोरीचा उद्देश असू शकतो या हेतूने ते वाहन पुढे नेत होते.

हि बाब बसंत कुमार यांच्या लक्षात आली आणि त्यांनी प्रसंगावधान राखून जीवाची पर्वा न करता सरळ दगड गोटे काय भेटतील ते रस्त्यावर टाकण्यास सुरुवात केली. वाहने आता थांबू लागली आणि असंख्य लोकांचे प्राण वाचले. देवदूत म्हणून धावून गेलेल्या बसंत कुमार यांच्या पुढाकारामुळे हि गंभीर घटना लक्षात आली, त्यांनी त्वरित पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि मग पोलीस व प्रशासन त्वरित घटना स्थळी येऊन पूल वाहतुकीस बंद करण्यात आला.

देवदूत बनून आलेले बसंत कुमार घटनास्थळी माहिती देताना.

इकडे महाड स्थानकातसुद्धा एक वेगळाच संशय पाहायला मिळत होता. कारण पोलादपूरला कँटिंगमध्ये जेवण करून २ एस. टी. बसेस स्थानकात एन्ट्री करून निघालेल्या होत्या परंतु बराच वेळ झाला तरी बस महाड स्थानकात पोहोचल्या नव्हत्या. महाडवरून मुंबईकडे जाणारे प्रवासीसुद्धा महाड बस स्थानकात बसची वाट पाहत ताटकळत राहिले होते.

पूल वाहून गेल्याची बातमी कळताच महाड बसस्थानकात संशय आणखीणच बळावला आणि कदाचित खात्री पटली कि २ एस.टी. बसेस बेपत्ता असून कोसळलेल्या पुलामुळे वाहून गेल्या असाव्यात. याव्यतिरिक्त आणखी किती वाहने आणि प्रवासी वाहून गेले याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे प्रशासनाचीही धाकधूक वाढत चाललेली. या घटनेचे गांभीर्यच इतके होते की क्षणात राज्यातील व नॅशनल मीडियामध्ये बातमी पोहोचली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील बातमी समजताच त्यांनी त्वरित जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. आजी-माजी आमदार व इतर स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा बातमी समजताच घटनास्थळी त्वरित धावून आले.

बातमी मीडियामध्ये गेल्यामुळे ज्या ज्या लोकांचे नातेवाईक या मार्गावरून प्रवास करत होते त्यांनी त्वरित फोन लावण्यास सुरुवात करून खुशाली जाणण्याचा प्रयत्न केला. ज्यांचे फोन लागून संपर्क होत होते त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला परंतु ज्यांचे फोन बंद येत होते त्यांच्या पायखालची जमीन सरकली होती. कारण नदीचे रौद्ररूप पाहता किती वाहने आणि प्रवासी वाहून गेलेत ते सुखरूप आहेत कि नाहीत याबद्दल काळजी आणि संभ्रम वाढत चालला होता.

तोपर्यंत दिवस आता उजाडलेला होता. आजूबाजूच्या गावातील लोक, महाड शहरातील लोक तसेच महाड MIDC मधील सेकंड शिफ्ट करून आलेले लोक आधीपासूनच घटनास्थळी गर्दी करून होते.

सर्वत्र पोलीस, प्रशासन आणि स्थानिक रिव्हर राफ्टिंगच्या स्टाफद्वारे शोधमोहीम सुरु करण्यात आले होते परंतु पाण्याच्या प्रवाहाच्या प्रचंड वेगामुळे अडथळा निर्माण होत होता. सर्वत्र काळजीत पडलेले होते आणि ज्यांचे फोन किंवा संपर्क होत नव्हता अशा लोकांचे नातेवाईकसुद्धा घटनास्थळी पोहोचले होते. जस-जसा दिवस पुढे जात होता सर्वांची काळजात धडधड व धाकधूक वाढत चालली होती. NDRF पथक आणि नेव्हीचीसुद्धा मदत पोहोचली, स्वतः मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून प्रशासनाला सूचना केल्या. परंतु अजून काहीच हाती लागत नव्हते.

वाहून गेलेली st बस

जशी वेळ वाढत जाई तसे नेत्यांचे दौरे, प्रशासनाची शोधमोहीम आणि नातेवाईकांची काळजी वाढत होती. एव्हाना पाऊसाचा जोरसुद्धा थांबलेला परंतु पाण्याची पातळी वाढलेलीच होती आणि दिवसा मागे दिवस जाऊ लागले. कोणी पार समुद्रकिनाऱ्याकडे वाहून गेलेले मिळाले कोणी काही किलोमीटर नदी पात्रात वाहून मृत अवस्थेत मिळालेले. तब्बल ९ दिवसानंतर वाहून गेलेल्या २ ST बसेस १७०-२०० मीटर अंतरावरती सापडल्या आणि त्याद्वारे मृत प्रवाश्यांची संख्या काढण्यात आली. जवळपास १२ दिवसांच्या शोधकार्यानंतर एकूण ४२ जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले परंतु ६ जणांचा अजूनही काहीच पत्ता नव्हता.

तत्कालीन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील ६ महिन्यांपर्यंत युद्धपातळीवरती नवीन पूल उभारण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर १० महिन्यांत नवीन पूल बांधला देखील. २७ कोटी खर्च करून बनविलेल्या पुलाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाट्न झाले.

या सर्व घटनेला जवळपास वर्ष पूर्ण होणार होते. परंतु त्या ६ जणांच्या कुटुंबाने अजूनही आपले लोक जिवंत आहेत ते जग सोडून गेले नाहीत या हेतूने सतत सरकारकडे पाठपुरावा करत राहिले. रत्नागिरी, राजापूर, कांदिवली, विलेपार्ले अशा विविध ठिकाणचे हे ६ जण कोणी घरी कोंकणात तर कोणी कामानिमित्त गेले होते आणि त्यांच्यावरती काळाने घाला घातला. त्यांच्या कुटुंबाने कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या मारल्या परंतु शेवटी त्यांचे लोक घरी काही परतले नाहीच.

अजूनही आपले लोक येतील आणि आश्चर्याचा धक्का देतील याच विचारात हे कुटुंबातील लोक त्यांच्या आठवणीत जीवन जगात असून, आपली माणसे जग सोडून गेलेत हि गोष्ट मानण्यास तयार नाहीत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.