shekap

सप्टेंबर १९४६ रोजी शंकरराव मोरे यांनी काँग्रेसमध्ये असताना बऱ्याच आश्वासनांची पूर्ती न होता काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे व कामगारांचे राज्य असावे याविरोधात काम करत आहे म्हणून ३ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या सहकार्यांना घेऊन एक ऐतिहासिक बैठक घेऊन आळंदी येथे शेतकरी-कामगार पक्ष स्थापन केला. महाराष्ट्राच्या राजकारणात १९५७ पासून काँग्रेस पक्षाला तोडीस तोड लढत आणि विरोध करणारा पक्ष म्हणजे ‘शेतकरी कामगार पक्ष’.

शंकररावांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आणि सिद्धहस्त लेखणीने व जुगलबंद वक्तृत्वाने श्रमजीवी जनतेला समजेल अशा सोप्या भाषेत प्रचार करून १९५२ साली विधानसभा निवडणुकीत तब्बल २८ आमदार निवडून आणले आणि खेड्या-पाड्यात लालबावटा पसरविला. तसेच स्वतः सांस्थापक शंकरराव मोरे आणि इतर ३ सहकारी लोकसभेतसुद्धा निवडून गेले. त्यामुळे पक्ष स्थापनेपासून ते १९५६ सालापर्यंत शेकापचा सुवर्णकाळच होता असं म्हणावं लागेल.

“दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली आणि दुर्दैवाने शेकाप पक्ष फुटू लागला. आणि शंकररावांचे शिष्य व मानसपुत्र एन. डी. पाटील यांनी शंकररावांनंतर शेकापची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.”

शेतकरी कामगार पक्षाचे नवीन नेते एन डी पाटील यांनी सत्यशोधकी विचारांची कास धरून महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला जनसामान्यांपर्यंत या पक्षाचे कार्य पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न, रयत शिक्षण संस्था, गोरगरीब कामगार, उपेक्षित पीडित, शेतकरी यांच्या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ते स्वतः १९६० ते १९८२ सालापर्यंत विधानपरिषदेमध्ये आमदार राहिले.

“असा दावा केला जातो कि संयुक्त महाराष्ट्राच्या आधीपासूनच तब्बल एकवीसवेळा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेतेपद हे शेकापने भूषविले आहे.”

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतरही शेकापचे कार्य चालूच होते परंतु २८ आमदार निवडून आणण्याचा विक्रम जरी झाला असला तरी काही कालावधीनंतर वाताहत सुरु झाली होती. हे यश जरी टिकवता आले नसले तरी रायगड जिल्ह्यात शेकापने चांगले पाय रोवले होते. आणीबाणीच्या काळातही शेकापने आपले अस्तित्व दाखवले होते. परंतु हळूहळू पक्ष राज्यातील काही भागांपुरता मर्यादित होत गेला. ऐंशीचे दशक संपत आलेले आणि शेकापसारख्या विरोधी पक्षाची जागा शिवसेना आणि भाजप यांनी भरून काढली.

“सांगोला विधानसभेतून आमदार गणपतराव देशमुख यांनी तर सतत अकरा वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेला आहे.”

रायगडमध्ये शेकापने आपले स्थान कसे घट्ट केले?

ऍड. दत्तात्रय नारायण तथा दत्ता पाटील १९५७ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९६७ पासून १९९० पर्यंत सलग २५ वर्षे ते अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येत होते. एकूण २७ वर्षे ते विधानसभेचे आमदार होते. विधानसभेत अभ्यासू व कणखर आमदार म्हणून त्यांची छाप होती म्हणून साल १९८७ व १९८९ या काळात दोन वेळा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती.

कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी रायगड जिल्ह्याच्या खेडोपाडी शिक्षण नेले. अध्यापक विद्यालय, अभियांत्रिकी व होमिओपॅथी महाविद्यालये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालय ही त्यांच्या शैक्षणिक कार्याचे द्योतक आहेत. तसेच सेझ विरोधातील आंदोलने व भाषणे कार्यकर्ते यांना ऊर्जा व प्रेरणा देणारी होती. ते वय ८५ वर्षे असताना शनिवारी २७ ऑगस्ट, २०११ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

जसजसे जागतिकीकरण वाढत गेले तसे शेकापचे नेते सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निघून गेले. नवीन चेहऱ्यांना संधी किंवा प्रभावी नेतृत्वांना पक्षप्रवेश या बाबींकडे या पक्षाचे कदाचित कायमच दुर्लक्ष झाले आणि त्यादृष्टीने फारसे प्रयत्न न झाल्यामुळे रायगड जिल्हा आणि सोलापुरातील सांगोला एवढीच मर्यादित ताकद या पक्षाची राहिली आहे. एकीकडे पक्षाशी एकनिष्ठा बाळगून काम करणारे या पक्षाचे काही नेते होते आणि नक्कीच आहेत. त्यामध्ये अलिबागचे दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, परभणीचे अण्णासाहेब गव्हाणे, वाळवा-इस्लामपूरचे एन. डी. पाटील आणि सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांच्यामुले शेकाप आजही ताठ मानेने उभा आहे.

परंतु बेरजेचे राजकारण, अन्य पक्षांची युती करण्यामुळे पक्षाला दीर्घकाळ फटके बसत राहिले. २००४ साली रामशेठ ठाकूर यांनी शेकापला चिडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांची जशी वाताहत झाली तसेच शेकापचेसुद्धा झाले. अलिबागचे आमदार जयंत पाटील हे पक्षाचे सरचिटणीस आहेत. देशमुख आणि जयंत पाटील यांनी आता पक्षाचा नवा अध्याय व पक्षवाढीसाठी सुरुवात केली आहे.

सध्याच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच रायगडमध्ये शेकापचा एकही आमदार निवडून नाही आला. परंतु रायगड जिल्ह्या परिषदमध्ये राष्ट्रवादीसोबत युती असून सध्या शेकापचे जिल्हापरिषद अध्यक्ष आहे. जयंत पाटील हे ३ वेळा विधानपरिषद आमदार म्हणून निवडून आले आहेत. आजचा ७३ वा वर्धापन दिन आणि सध्याचे अपयश, बदललेले राजकारण यामधून शेकाप कशी उभारी घेऊ शकतो हे आता नजीकच्या काळात पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.