ajitpawar_suniltatkare_part1

भाग-१:

विसाव्या शतकाच्या अखेरीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने उदयास आलेले कणखर नेतृत्व म्हणजे मा. अजितदादा पवार. त्यांनी #बारामती तालुका स्थरावरच्या सहकारी चळवळीच्या माध्यमातून आपल्या समाजकारण व राजकारणाची सुरुवात करून १९९१ साली झालेल्या निवडणुकीत बारामती मतदार संघातून प्रचंड बहुमताने विजय मिळवत संसदेत प्रवेश केला. #पुणे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहाखातर अजितदादांची उमेदवारी पवार साहेबांनी मान्य केली व दादांचा प्रचंड विजय झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाच्या राजकारणात फार मोठी उलथापालथ झाली. मा. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर आदरणीय पवार साहेबांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून सूत्र हाती घेतली.

१९६२ च्या चीनच्या युद्धानंतर पंडित नेहरू यांनी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना संरक्षण मंत्री म्हणून आग्रह धरला. याचे वर्णन “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला” असे करण्यात आले होते. तीस वर्षाच्या कालावधीनंतर आदरणीय पवार साहेबांच्या रुपाने इतिहासाची पुनरावृत्ती होत “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला” असेच वातावरण पवार साहेबांनी संरक्षण मंत्री म्हणून सूत्र हातात घेतल्यावर तयार झाले होते. स्वाभाविकच मा. दादांचा लोकसभा प्रवेश अल्पकालीन ठरला. आदरणीय पवार साहेबांना लोकसभेत निवडून जाणे असल्याने मा. दादांना राजीनामा द्यावा लागला व संसदेची कारकीर्द अल्पजीवी ठरली. पण त्याच वेळेस स्व. सुधाकर नाईक यांच्या सरकारमध्ये मा. अजितदादांना राज्य शासनात काम करण्याची संधी मिळाली.

दादा व माझी पहिली भेट त्यावेळी मंत्रालयातील दालनात झाली. त्यावेळी रायगडचा जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील प्रश्नासंबंधी भेटलो. पहिल्याच भेटीत त्यांच्या कामाची तडफ पाहून प्रभावित झालो. सुदैवाने मला आदरणीय पवार साहेब, महाराष्ट्राचे थोर नेते स्व. वसंतरावदादा पाटील, स्व. बॅ.ए.आर.अंतुले साहेब, स्व. शंकररावजी चव्हाण, स्व. विलासरावजी देशमुख, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे आदी नेते व त्यांचे प्रशासन कौशल्य जवळून पाहण्याची संधी मिळाली. अजितदादांच्या पहिल्याच भेटीत त्यांचा प्रश्न समजून घेण्याचा अवाका, प्रश्न सोडविण्याची विलक्षण हातोटी व प्रचंड आत्मविश्वास पहायला मिळाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील उद्याचा एक मोठा नेता म्हणून साहजिकच त्यांची एक प्रतिमा माझ्या मनात तयार झाली.

१९९५ च्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत माणगांव-रोहाच्या जनतेने मला विधानसभेत काम करण्याची संधी दिली. मी पहिल्यांदाच विधिमंडळात प्रवेश केला तेव्हा महाराष्ट्र राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले होते. कॉंग्रेस प्रमुख विरोधी पक्ष बनला. आदरणीय पवार साहेबांनी मला विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाचा चिटणीस म्हणून काम करण्याची संधी दिली. पहिल्या अधिवेशनापासूनच विरोधी पक्षाच्या बाकावर एकाच नेत्याची उपस्थिती कामकाज सुरु झाल्यापासून संपेपर्यंत असायची त्या नेत्याचे नाव अजितदादा पवार. त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दादांजवळ संवाद साधण्याची, विधिमंडळातील कामकाज पाहण्याची संधी मला अनेकदा मिळाली. संसदीय कामात दक्ष राहून वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी दादांनी मला नेहमीच प्रोत्साहित केले. त्याचवेळी त्यांना राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळाले. त्याचवेळी राज्यातील सहकार क्षेत्रातील प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची तळमळ पाहिली. राज्यातील सहकार चळवळीतील नेते भेटायला आल्यावर स्पष्ट व परखड शब्दात काही बाबी त्यांना सांगायचे पण मदत करण्यात त्यांनी कधीही हयगय केली नाही.

१९९९ सालची महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरुवात वादळी झाली. स्वाभिमानाच्या विचारातून आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. १० जूनला मुंबई येथील शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावर अभूतपूर्व अशा प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने मेळावा झाला तेव्हा मी राष्ट्रवादी पक्षात सामील झालो नव्हतो. ९ जुलै रोजी आदरणीय पवार साहेबांसमवेत दिल्लीत माझा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा झाली. पक्षात सामील होण्याचा निर्णय झाला पण आदरणीय पवार साहेबांनी मला सूचित केले की निर्णय जाहीर करण्यासाठी थांबूया. मुंबईत तुझी महाराष्ट्राच्या नेत्यासोबत चर्चा होईल तेव्हा तुझ्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेऊ…

भाग-२

भाग-२

मी मुंबईत परतलो. बरोबर १४ जुलैला मला फोन आला. धारधार आवाजाची व्यक्ती ‘मी अजित पवार बोलतोय’,’तुमची भेट घेण्याची आहे’, असे म्हणाली. त्या क्षणाला माझ्या लक्षात आले की दिल्लीत पवार साहेबांसोबत चर्चा झाल्यावर मुंबईत कोणातरी नेत्यासोबत चर्चा होईल असे म्हणाले ते नेते अजितदादा पवार होते. क्षणार्धात मनात विचार चमकून गेला पवार साहेबांनीच तर माझ्या व अजित दादांच्या मैत्रीचं नातं प्रस्तावित करण्याचे ठरवले आहे. ठरल्याप्रमाणेच माझी व दादांची भेट मनोरा आमदार निवास रूम नं. १३५ मध्ये झाली. दोन तास वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली.

माझ्या दिवंगत वडिलांचे राजकारण व मी राजकारणात प्रवेश केल्यानंतरची (१९८४ ते १९९९) माझी राजकीय भूमिका मी दादांना सांगितली. त्यात बॅ.अंतुले साहेबांसोबतचा राजकीय प्रवास, स्व.विलासरावजी देशमुख साहेबांसमवेत असलेले जिव्हाळ्याचे संबंध यासंबंधी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणातील विविध कंगोरे व माझी राजकीय भूमिका हे स्पष्ट सांगितल्यावर त्यांनी मला एकाच वाक्यात सांगितले, “सुनिलजी, यापूर्वी झाले ते झाले. पण यापुढे मा. पवार साहेबांच्या नेतृत्वात आपण एकत्रित काम करू. माझी पूर्णत्वाची राजकीय साथ तुमच्या सोबत राहील हा विश्वास मी देतो, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये सामील व्हा, निश्चिंत रहा” असा ‘विश्वास’ मला अजितदादांनी दिला. त्या भेटीतच माझा पक्षप्रवेशाचा निर्णय झाल्यावर सुरेश लाड सुद्धा पक्षप्रवेश करतील. त्यांना कर्जतमधून उमेदवारी मिळावी असा प्रेमळ आग्रह दादांकडे धरला.

दादांनी मला शब्द दिला की सुरेश लाड यांची उमेदवारी राष्ट्रवादीतून नक्की होईल. तद्नंतर अनेक राजकीय घडामोडी रायगडात घडल्या. सुरेश लाड यांच्या उमेदवारीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. परंतु दादांनी फोन करून निक्षून सांगितले की तुम्ही निश्चिंत रहा आणि उमेदवारांच्या शेवटच्या यादीत सुरेश लाड यांचे नाव घोषित केले. त्याचवेळी दादा शब्दाचे पक्के असल्याचा अंदाज आला. त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू अनुभवायला मिळाले.

१९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रवादी पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. तरी सत्तास्थापन प्रक्रियेत पवार साहेबांनी मोठी हालचाल सुरु केली. तेव्हा दादांचा सहभाग सक्रिय असल्याचे जाणवले. राष्ट्रवादीच्या विधिमंडळाच्या बैठका त्यावेळी नियमित सुरु झाल्या. ज्येष्ठ नेते व तरुण आमदारांतला अजितदादांचा सहज वावर, संवाद, पक्षातील त्यांचे स्थान ध्वनित करणारा दिसत होता. महाराष्ट्रात लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन केले आणि पवार साहेबांनी मला राज्यमंत्री म्हणून संधी दिली. नगरविकास खाते मिळाले व रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला संधी देण्यात आली. त्यावेळी दादांनी मला बोलावले व सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याची जबाबदारी दिली व माझे पाठबळ लाभेल असा शब्दही दिला.

सारं काही सुरळीत सुरू असताना २००२ साली जिल्हा परिषद निवडणूक झाल्या. राज्यात शेतकरी कामगार पक्ष सोबत होता परंतु जिल्ह्यात विरोधात लढलो. जिल्ह्यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. आदरणीय पवार साहेबांची तब्येत ठीक नव्हती पण त्यांनी मला बोलावून घेतले. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील, त्यावेळचे रायगडचे पालकमंत्री गणपतरावजी देशमुख यांच्यासमोर जिल्ह्यात आपण व शेतकरी कामगार पक्ष एकत्रित काम करण्याचा आदेश दिला व ती जबाबदारी माझ्यावर दिली. जिल्ह्यात वातावरण वेगळे होते. राष्ट्रवादी व कॉंग्रेस नेत्यांना विनंती करून सुद्धा त्यांनी परंपरागत विरोध असलेल्या शेतकरी कामगार पक्षासोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे पवार साहेबांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती ती मी पूर्ण करण्यास अपयशी ठरलो पण ते मी जाणून बुजून केले असा कांगावा करण्यात आला. मला आठवतो तो दिवस २१ मार्च हा होता आणि मी अलिबागहून मुंबईला परतत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेबांनी मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगितले. मी लागलीच दादांना फोन केला ते साताऱ्यात होते, त्यांनी फोनवरुनच मला धीर दिला, ‘मी साहेबांसोबत’ या बाबतीत बोलेन. त्याप्रमाणे दादा माझ्या पाठीशी उभे राहिले पण शेतकरी कामगार पक्षाने फारच आग्रह धरला, त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होते आणि काठावरच बहुमत सरकारकडे असल्याने मला राजीनामा द्यावा लागला.

माझी काहीच राजकीय चूक नसताना माझ्या राजीनाम्यामुळे कोकणातील राष्ट्रवादी कार्यकर्ते हवालदिल झाले. अशावेळी दादा या राजकीय घडामोडीत माझ्या पाठीशी शक्तीनिशी उभे राहिले. तो कालखंड माझ्यासाठी कसोटीचा होता राज्याच्या राजकीय प्रवाहापासून बाजूला पडल्याचे मनात उभे राहत होते. अशा कठीण राजकीय कालखंडात अजितदादांनी मला खूप विश्वास व धीर दिला. मला परत मंत्रिमंडळात घेण्यास दादांनी आग्रह धरला. साहेबांनी माझा परत मंत्रिमंडळात समावेश केला. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला.

शेतकरी कामगार पक्षाच्या तीनही मंत्र्यांनी राजीनामे दिले व विलासराव देशमुख सरकारसमोर संकट उभे राहिले. अशा अभूतपूर्व राजकीय परिस्थितीत मी राजीनामा दिला. सरकारने विश्वासदर्शक ठराव पास केला पण माझ्या राजीनाम्याची खंत दादांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. दादांनी धीर दिला पवार साहेब न्याय देतील माझ्यावर विश्वास ठेव असा प्रेमाचा, आपुलकीचा शब्द दिला. राज्यात विलासराव पायउतार होऊन सुशिलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी पवार साहेबांनी राज्यमंत्री म्हणून माझा समावेश केला. त्यात दादांचा आग्रह लपून राहिला नाही. मैत्रीचा धागा त्याची वीण अधिक घट्ट होत गेली.

२००४ मध्ये पुन्हा राष्ट्रवादी व कॉंग्रेसने यश मिळविले. राज्यात लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाले. माझी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी व रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. कोकणात त्याकाळात विविध विकासकामे मंजूर करण्यात दादांची साथ मिळाली. उर्जा मंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा विभागाची जबाबदारी माझ्यावर मा. साहेबांनी विश्वासाने सोपविली. या राजकीय घडामोडीत अजितदादांचा विश्वास उपयोगी पडत होता यात जराही संदेह नाही.

या कालावधीत अजितदादांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. प्रचंड मेहनत, झपाट्याने काम करण्याची विलक्षण हातोटी, कार्यकर्त्याला स्पष्ट शब्दात सांगण्याची पद्धत पण त्याचबरोबर विश्वास निर्माण करण्याची कला यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागली. त्यांचे नेतृत्व बहरायला लागले. फारसे प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम भले व आपण भले ही पद्धत त्यांनी अवलंबवली होती. सभागृहात मंत्री म्हणून त्यांची भाषणे प्रभावी ठरू लागली. महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते म्हणून दादांचे नाव चर्चेला येऊ लागले. कॉंग्रेस बरोबरची राजकीय वाटाघाटी, पक्षांतर्गत अनेक राजकीय बाबी असोत, दादा त्यांच्या एका विवक्षित पद्धतीने काम करण्याची भूमिका घेत संघटनेत चैतन्य फुलवीत राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा वाढत चालेला प्रभाव लक्षात घेता विरोधी पक्षांना त्यांच्याबद्दल एक वेगळा आकस वाटायला लागला. त्यांचे नेतृत्व आव्हानात्मक वाटायला लागले. यातूनच विरोधकांनी त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली. आरोप करायची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांना संधी मिळाल्यावर विरोधकांनी त्यांना “लक्ष्य” करण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांना मनस्ताप व टीकेला सामोरे जावे लागले. दुर्दैवाने त्याचवेळी एक वाक्य मा. दादांकडून चुकीचे गेल्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्यावर टीका झाली. त्या वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. मा. चव्हाण साहेबांच्या प्रतिमेसमोर मौनव्रत धरले. तरी विरोधक त्यांना टार्गेट करीत राहिले. यातूनच दादांचा राजकीय आलेख वाढत असल्याचे लक्षात आले. अखेर दादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला…

भाग-३

भाग-३

त्यावेळी मलाही टीकेला सामोरे जावे लागले. माझ्यावरही विरोधकांनी आरोप केले. त्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहण्याची दादांची प्रतिक्रिया मला भावली. सिंचन क्षेत्रात झालेली वाढ व खर्च या संदर्भात प्रचंड आरोप झाले. पण आमची प्रतिमा डागाळण्यात विरोधकांना यश आले नाही. माननीय अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. लोकसभेच्या निवडणुकीत माझा पराभव झाल्यावर मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी आदरणीय पवार साहेबांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. उपमुख्यमंत्री म्हणून दादा व मी महाराष्ट्रात फिरलो. प्रतिकूल परिस्थिती असतानाही पक्षात चैतन्य निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यावेळी दादांसमवेत महाराष्ट्र फिरण्याची संधी मला मिळाली. २०१४ नंतर राज्यात सत्तांतर झाले २०१४ ते २०१९ हा कालखंड विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. त्यावेळेला मी विधिमंडळात असले पाहिजे असा आग्रह दादांनी धरला, श्री. विनायक राऊत यांच्या रिक्त जागेत मला निवडून विधानपरिषदेत संधी दिली. २०१४ ते २०१९ दरम्यान चौकशीला सामोरे जावे लागले. यावेळी ५ वर्षांत राज्यात तीन वेळेस शासनाच्या धोरणांविरोधी व पक्ष संघटनेसाठी दौरे केले. सलग पंधरा-पंधरा दिवस तालुका, जिल्ह्याला भेटी दिल्या. तो कालखंड विलक्षण अनुभवाचा होता. यावेळी दादांसोबत अनेक विषयांवर चर्चा होत होत्या. दादांच्या स्वभावाचे अनेक पैलू अनुभवायला मिळाले. मिश्कील स्वभाव व वरून कठोर भासणारे दादा मनाने किती निर्मळ आहेत हे प्रकर्षाने अनुभवले. त्यांच्या स्वभावाची गुण वैशिष्ट्ये समजून घेता आली. विलक्षण कामकाजाचा अनुभव घेता आला. वक्तशीरपणा आदरणीय साहेबांप्रमाणेच त्यांच्या नसात भिनला आहे हे जाणवले. त्यांचं सकाळी ७ वाजल्यापासून दिवसभर न थकता काम करणे, असे अनेक अनुभव त्यांच्या सोबतीत अनुभवता आले. याचा प्रभाव माझ्यावर पडत गेला. २०१९ ला मी पुन्हा लोकसभा लढवावी हा दादांचा आग्रह होता. निकालात चढ-उतार होत होती पण निवडून आल्यावर दादांना खूप आनंद झाला.

सकाळी सहा वाजता सुद्धा जाहीर कार्यक्रम घेण्याची त्यांची पद्धत मनास भावते. पुण्यासारख्या शहरात सकाळी ८ वाजता पुलाच्या उद्घाटनप्रसंगी लोकांची मोठी उपस्थिती ही त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्वाला जनतेची साथ आहे हे जाणवते.

वक्तशीरपणा व वैयक्तिक टापटीपपणा हा दादांचा स्वभाव. एक अनुभव सांगतो, बारामतीत आम्ही त्यांच्या मतदार संघातील कामांची पाहणी करीत होतो. गाडीत आम्ही दोघेच होतो. दादा स्वतः ड्रायव्हिंग करत होते तेव्हा एक घटना घडली आणि स्वच्छता प्रिय असलेल्या दादांचा स्वभाव अनुभवला. रस्त्यात एक मोटार सायकल स्वार केळी खात होता. त्याने साल रस्त्यावर टाकली हे दादांनी पाहिले. गाडी वेगात असल्यामुळे पुढे जाऊन त्यांनी गाडी वळवून त्या व्यक्तीकडे नेली. दादा आपल्याकडे येत आहेत हे पाहून त्या व्यक्तीने ती साल उचलून आपल्या खिशात लपवण्याचा प्रयत्न केला व केविलवाण्या नजरेने दादांकडे पाहू लागला. दादा त्याला म्हणाले “ती साल दे माझ्याकडे, मी स्वच्छता करायलाच बसलो आहे”. आपल्या घराप्रमाणेच आपले शहर सुद्धा स्वच्छ असावे या दृष्टिकोनामुळे दादांप्रती असलेला आदर अजून वाढला. स्वच्छता व टापटीपपणासोबतच शासकीय कार्यालये, निवासस्थाने, कसे स्वच्छ असावे तसेच बागबगीच्यातील झाडे, शासकीय इमारती व भोवतालचे वातावरण कसे असावे याचा ध्यास घेणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा. अलीकडच्या काळात असे अपवादात्मक नेतृत्व पहायला मिळतात. आपल्या वेगवेगळ्या गुण वैशिष्टांमुळे दादांचे नेतृत्व अधोरेखित होते.

२०१९ च्या लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षातील दीर्घकाळ सत्ता अनुभवलेल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये प्रवेश करायची स्पर्धा सुरु झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधील सुद्धा अनेक नेते, सहकारी पक्षांतर करू लागले. अशा कठीण राजकीय परिस्थितीत ५० वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले मा. पवार साहेब व मा. अजितदादा अविचल राहिले. महाराष्ट्रात मा. पवार साहेबांनी वयाच्या ८० व्या वर्षी झंझावात सुरू केला. मा. दादांनीही त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्र ढवळून काढायची सुरुवात केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी कंबर कसली. पक्षाचे नेते खा. प्रफुल्लभाई पटेल, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रियाताई, धनंजय मुंडे, खा. अमोल कोल्हे यांनी प्रचंड मेहनत घेतली. मुसळधार पावसात सातारा येथे आदरणीय पवार साहेबांच्या सभेने राज्यात वातावरण बदलेले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले.

अनेक नवीन चेहरे राजकारणात आणण्याची किमया पवार साहेबांनी करून दाखवली. विधानसभा निवडणूकीचा निकाल, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथापालथ, महाराष्ट्रात लागू झालेली राष्ट्रपती राजवट, स्थापन झालेले अल्पतासांचे सरकार यामुळे देशभरामध्ये मोठे वादळ निर्माण झाले. यथावकाश झालं-गेलं विसरून पवार साहेबांनी मोठ्या अंतःकरणाने पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची घडी बसवली. माननीय दादा उपमुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. राज्याची आर्थिक घडी बिघडलेली असतानाही दादांनी अत्यंत कुशलतेने राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला. सर्व क्षेत्र, घटक यांना न्याय देत असताना महाराष्ट्राच्या नव्या उभारणीचे संकेत दिले. महाविकास आघाडी सरकारला गती दिली. पुढे करोनाच्या संकटाला सामोरे जावे लागले. या लॉकडाऊनच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही मंत्रालयात रोज उपस्थिती लावणारे एकमेव नेते म्हणजे अजितदादा पवार. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेतून राज्य सरकारला सावरण्याचा प्रयत्न करीत मंत्रालयातल्या त्यांच्या उपस्थितीने दादांनी एक वेगळाच निर्धाराचा संकेत देशाला व महाराष्ट्राला दिला, याचा आम्हाला सर्वांनाच सार्थ अभिमान आहे.

माननीय अजितदादा आज वयाची ६० वर्षे पूर्ण करून ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ६१ वे वर्ष, प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक वेगळा अनुभव असतो. आम्हां सर्वांचीच व राज्याच्या जनतेची इच्छा होती की दादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा. पण करोनाचे संकट व चक्रीवादळ यामुळे यावर्षी तो साजरा करू शकत नाही. दादांनी आधीच घोषित केले आहे की या दिवशी ते कोणालाच भेटणार नाहीत. ६१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. उद्याच्या महाराष्ट्राला सर्वदूर दिशा देण्याचे काम त्यांच्या हातून घडेल, हा विश्वास व्यक्त करीत असताना त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. धन्यवाद!

समाप्त..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.