Suresh salvi

रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यामधील वरदायिनी विद्यालय महागांव कमिटीचे अध्यक्ष व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेशशेठ साळवी यांचा सत्कार रायगडचे खासदार सुनिलजी तटकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

सुरेश साळवी हे महागांव विभागातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असून, दानशूर सेवाभावी वृत्ती व अडीअडचणींना सर्वाना मदतीचा हात पुढे करणारे अनेकांचे शेठ तर कित्यकजणांचे सुरेशमामा म्हणून सुप्रसिद्ध आहेत.

दळणवळणाची साधने नसताना यशस्वी व्यावसायिक:



बालपणीच पितृछत्र हरपले तरी त्या काळात गावामध्ये ४ थी नंतर शिक्षण नसताना पुढील शिक्षण गावापासून ८ किमी अंतरावर असणाऱ्या तळवली गावात राहून पूर्ण केले तसेच शेतीसोबत किराणा मालाचे दुकान सुरु केले.

अत्यंत दुर्गम भाग, दळणवळणाची कोणतीही साधने उपलब्ध नसताना त्याकाळी डोक्यावरून माल वाहतूक करून आपला व्यवसाय वाढवला. या किराणा मालाच्या व्यवसायाच्या जोडीला ७ नोव्हेंबर १९६४ साली सरकारमान्य रास्तभाव साखर व धान्य दुकान चालविण्याचा परवाना मिळवला.

आपले धाकटे बंधू चंद्रकांत रामभाऊ साळवी यांच्या साथीने शेती व हे दोन्ही व्यवसाय अत्यंत कष्टाने व प्रामाणिकपणे आजतागायत सुरु ठेवलेले आहेत.

समाजकारण, राजकारण आणि नोकरी:



समाजसेवेची आवड व परोपकारी वृत्ती या अंगभूत गुणांमुळे त्यांनी अनेकांना अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे केला व अनेकांचे संसार सावरले. आपण केलेल्या मदतीची परतफेड होईल याची त्यांनी कधीच कोणती अपेक्षा ठेवली नाही.



त्यांनी गावात काही वर्षे पोस्टमास्तर म्हणून काम केले तसेच ग्रुपग्रामपंचायत महागांवचे सदस्य, गणेश विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, अ. भा. सो. क्ष. कासार समाज मध्यवर्ती समाजोन्नती मंडळाचे सदस्य व रायगड जिल्हाअध्यक्षपद भूषवले.



त्यांच्या प्रयत्नांमुळे १९८३ साली गावामध्ये वीज आली व त्यानंतर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. तसेच त्यांनी समाजमंदिर व विविध लोकोपयोगी कामे करून घेतली.

वरदायिनी विद्यालय महागांव नावाने माध्यमिक शिक्षण सुरु केले.

महागांव व पंचक्रोशीत १९८१ सालापर्यंत इयत्ता ७वी नंतर माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. म्हणून सुरेशशेठ साळवी यांनी आपले बहुजन समाजातील निकटचे सहकारी कै. दौलत तु. साळवी, गंगाराम सि. साळवी व अन्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जुलै १९८१ साली वरदायिनी विद्यालय महागांव नावाने माध्यमिक शिक्षण सुरु केले.



अत्यंत बिकट परिस्थितीत सुरु केलेल्या विद्यालयात विद्यार्थी मिळवणे, शिक्षकवर्ग तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसताना आलेल्या अनंत अडचणींवर मात करत तब्बल १४ वर्षे विना अनुदान तत्वावर हे विद्यालय टिकवून ठेवले. हे विद्यालय इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाशी जोडले परंतु शिक्षकांचा पगार, शैक्षणिक साहित्य, इमारत बांधकाम व दुरुस्ती यासाठी लागणार लाखो रुपयांचा अधिक भार त्यांनी सोसला.

अनेक विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर, उद्योजक झाले:



या विद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, ग्रामसेवक, उद्योजक बनले. याच विद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या त्यांच्या २ मुली प्राथमिक शिक्षिका असून, मुलगा दिनेश साळवी व पुतणे शशिकांत आणि श्रीकांत साळवी हे इंजिनिअर असून मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत.



त्यांनी लावलेल्या वरदायिनी विद्यालय महागांव या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होऊन अनेकांना त्याची फळे चाखता आली यातच त्यांच्या महान कार्याचे सार्थक झाले. प्रसिद्धीपासून ते आजही दूरच असून आपला समाजकार्याचा वसा चालू ठेवला आहे.

देर आये दुरुस्त आये.. खरंतर अशा छोट्या मोठ्या सत्काराने या योगदानाचं मूल्यमापन होणार नाही, त्यांची शिक्षणाप्रती असलेली तळमळ माझ्या सह कित्येक जणांनी अनुभवलेय. आपण शिक्षण मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत ,काबाडकष्ट पुढच्या पिढीला विनासायास मिळावी यासाठी महत्प्रयासाने हायस्कूल सुरू करून ते कित्येक वर्ष विनाअनुदानित चालवण्यात केवळ आपल्या विभागातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावे या सद्हेतूने करत राहिलात. तुम्ही ग्रेट आहात आणि राहाल. तुमच्या कार्याचा यथोचित सन्मान झाला याचा मला तुमचा मुलगा म्हणून कायम अभिमान राहील.अजून खूप लिहायचंय पण तूर्तास पुरे…शतायुषी व्हा!!

– दिनेश सुरेश साळवी

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.