serum institute

इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत जोडीने पुणे येथील सिरम इन्स्टिटयूट कोरोना बरा होण्यासाठीचा डोस बनवत असून तो अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सिरम कंपनी वर्षाला जवळजवळ १३० करोड डोसचे उत्पादन करते ज्यांची जगभरात विक्री केली जाते. परंतु सिरमचा डोस बनवण्यासंदर्भातला प्रवास खूपच रंजक आणि भारतीयांसाठी खूप महत्वाचादेखील आहे.

सिरम इन्स्टिटयूटने टीबी आजारासंदर्भात औषध बनवले आहे, तसेच लहान मुलांचे डोस, पोलिओ, रुबेला, रेबीजचे अँटीबॉडी डोस आणि हल्लीच २००९ मध्ये आलेला स्वाईन फ्लू संदर्भातील डोस बनवून संपूर्ण जगाला आपले कौशल्य दाखवून दिले.

“याच विश्वासाच्या आधारावरती AstraZeneca या फार्मा कंपनीसोबत टाय अप करून ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत भागीदारीने आताचा आलेल्या कोरोनाचे महासंकट टाळण्यासाठी सिरम इन्स्टिटयूट लस बनवत असून ती अंतिम टप्प्यात आली आहे.”

सिरम इन्स्टिटयूटची स्थापना कशा रीतीने झाली:

आपण जेव्हा स्वारगेटहून हडपसरकडे जातो तेव्हा डाव्या बाजूला एक रेसकोर्स आपल्याला दिसतोच दिसतो. बऱ्याच जणांनी आयुष्यात पहिल्यांदा रेसकोर्स याचठिकाणी पाहिलाय कारण तो एकदम रोडलगत आहे म्हणून. या रेसकोर्सचे मालक आहेत सायरस पुनावाला जे सध्याचे पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व. ते पहिल्यापासूनच शिरमंत घराण्यातले परंतु आत्ताची जी श्रीमंती आहे तेवढी नव्हती. १९४६ मध्ये त्यांच्या वडिलांनी पुनावाला स्टड या कंपनीची स्थापना केली. रेससाठी लागणाऱ्या घोड्यांची पैदास व वाढविणे याचा हा बिझनेस होता जो त्यांनी सुरुवातीला फक्त १३ घोड्यांपासून केला.

रेसकोर्स

शिक्षण आटोपून सायरस पुनावाला यांच्याकडे कंपनीची सूत्रे हातात आली. त्याकाळी बी.कॉम चं शिक्षण पूर्ण केलेल्या सायरस पुनावाला यांनी वडिलोपार्जित उद्योग सांभाळायचं ठरवलंच परंतु त्यांना देखील वेगळं काहीतरी करायचं होत. तारुण्यात असल्यामुळे त्यांना रेस कारचे वेड होते म्हणून त्यांनी रेसिंग कारच्या संदर्भातला व्यवसाय सुरु केला. परंतु त्यांना त्यात अपयश आले आणि ते त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. परंतु त्यांनी खचून न जाता पुढील वाटचालीकडे लक्ष्य दिले.

रेसच्या घोड्यांच्या बिझनेसमध्ये घोडे एकदा म्हातारे झाले कि मग त्यांना बोली लागणे बंद व्हायचे मग हे म्हातारे घोडे ते मुंबईतील “हाफकिन इन्स्टिट्यूटला” विकायचे. म्हातारे घोडे असल्यामुळे त्यांना किंमत तशी कमीच यायची. परंतु सायरस पुनावाला यांना तोच प्रश्न पडला कि हाफकिन इन्स्टिट्यूट नक्की या घोड्यांवरती काय प्रयोग करत असतील. म्हणून त्यांनी या गोष्टींची माहिती काढण्यास सुरुवात करून त्याबाबतीत अभ्यास सुरु केला.

“हाफकिन इन्स्टिट्यूट घोड्यांच्या रक्तातील सिरम नावाच्या घटकापासून लस निर्माण करायचे आणि पूर्वी जे साथीचे रोग यायचे त्यांना आटोक्यात आणून लोकांचे प्राण वाचण्यास मदत व्हायची. सायरस पुनावाला यांना प्रयोगाची प्रोसेस समजली नाही परंतु त्यांनी ठरवले कि हाच बिझनेस सुरु करायचा ज्यामुळे आपण एकप्रकारे लोकांची सेवाच करणार आहोत. “

१९६६ साली त्याकाळचे साधारण ४ लाखांपर्यंत भांडवल गोळा करून आपला भाऊ जाव्री पूनावाला याला सोबत घेऊन सायरस यांनी सिरम इन्स्टिटयूट इंडियाची स्थापना केली आणि हाफकिन इन्सिट्यूटमधून हुशार आणि खास १० डॉक्टरांची नेमणूक केली. सुरुवातीला सलग २ वर्षे अथक परिश्रम घेऊन कमी दरात उपलब्ध अशी धनुर्वाताची लस त्यांनी बनवली. सरकारलाही कमी दरात लस मिळत असल्याने त्यांनी देखील कंपनीला मान्यता देऊन सरकारी दवाखान्यांचे कंत्राटही सिरम इन्स्टिट्यूटलाच दिले. हे त्यांचं पाहिलं यश आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलेच नाही.

“जगातील टॉप ३ नंबरची आणि आशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी म्हणून सिरम इन्सिट्यूट इंडियाचा उल्लेख केला जातो. सध्या त्यांचा मुलगा आधर पुनावाला कंपनीचा कारभार पाहत आहेत. “

आपल्या सर्वांच्याच शरीरावर इंजेक्शनची खून असेल जी लस एकदम स्वस्तात सायरस पुनावाला यांच्यामुळे शक्य झाली आणि म्हणूनच त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला गेला आहे. आजवर अनेक साथीच्या रोगांपासून प्रतिबंधात्मक लस तयार करून आपण भारतीयांचे जीवन वाचविले आहे.

आता तुम्ही म्हणाल वरती सायरस पुनावाला यांच्या फोटोसोबत शरद पवारांचा का फोटो आहे.

सायरस पुनावाला हे ख्यातनाम उद्योगपती होतेच परंतु शरद पवारांचे वर्गमित्रसुद्धा होते. वेळोवेळी शरद पवारांचंही सायरस पुनावाला यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. एकदा एका कार्यक्रमात शरद पवार हे आपले मित्र सायरस यांच्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या मैत्रीचे शाळेतील जुने किस्से सांगितले.

शाळेत असताना सायरस यांना झोप यायची म्हणून शिक्षिकेने त्यांना उपहासाने शाळेत खाट आणून झोपण्यास सांगितलेले. सायरस यांनीही दुसऱ्यादिवशी शाळेत चक्क झोपण्यासाठी खाट आणली. शिक्षकांनी विचारल्यावरती त्यांनीही पटकन उत्तर दिले आपणच म्हटलं होतात खाट आणायला मग मी तुमचा आज्ञाधारक विद्यार्थी असल्यामुळे आलो घेऊन.

“शरद पवार यांनी ट्विटरद्वारेसुद्धा डॉ. सायरस पूनावाला यांची स्तुती केली आणि त्यात त्यांनी नमूद केले आहे कि डॉ. सायरस पूनावाला म्हणजे कोणतीही जाहिरातबाजी किंवा सेवेचं प्रदर्शन न करता मानवजातीचे आरोग्यहीत जपणारे आणि त्यातूनही व्यवसाय वृद्धिंगत करणारे आगळे आणि वेगळे कर्मोद्योगी आहेत.”

लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांनीच कमविण्याच्या हेतूने उद्योगधंदे केले परंतु फार पूर्वीपासूनच सायरस पूनावाला यांच्या कंपनीने भारतीयांसाठी स्वस्त दरात लसी व डोस उपलब्ध करून दिले. आता बनविल्या जाणाऱ्या कोरोना आजारावरील लससुद्धा भारतीयांच्या दृष्टीने राखीव ठेवल्या जाणार आहेत आणि मग इतर जगभरातील देशांत ते विकले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.