Tukaram Mundhe

संघर्षमय जीवन जगून मोठा झालेला माणूस आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि धडक निर्णयांमुळे महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेला माणूस म्हणजे आयएएस अधिकारी श्री. तुकाराम मुंढे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म आणि हाल-अपेष्टा कायम पदरी असताना स्वबळावर यशाची उंची गाठलेल्या तुकाराम मुंढे यांची बदली कायम स्थानिक प्रशासनासोबत होणारे वाद आणि मतभेत यामुळे होत आली आहे.

गावाची लोकसंख्या सर्वसाधारणपणे पाच हजाराच्या आसपास असणाऱ्या बीड जिल्ह्यातील ताडसून्न या गावचे तुकाराम मुंढे हे सुपुत्र आहेत. हे गाव १०० टक्के शेतीवर निर्भर असून कमी पाऊस आणि कोरडी जमीन असल्यामुळे फार मेहनत घ्यावी लागते.

आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्याच परिस्थितीत गावातच १०वी पर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी झाल्यानंतर ते औरंगाबादला गेले पण अचानक शहराकडे गेल्यामुळे सर्वच गोष्टी आश्चर्यकारक होत्या, त्यांनी आयुष्यातील पहिला चित्रपटसुद्धा १० वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिला होता.

मोठ्या भावाने तुला कलेक्टर व्हायचंय असं सांगितलं आणि त्यांनी ११वी-१२वी पूर्ण करून तुकाराम मुंढे यांनी युपीएससीचा अभ्यास करायला घेतला. परंतु त्यांना याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांनी शहरातील परिस्थितीशी आणि वातावरणाशी जुळवून घेऊन अभ्यास सुरु केला. त्यांचा मोठा भाऊ क्लासेस घेत असे तेच त्यांना आर्थिक मदत करत असत.

यूपीएससीची तयारी करत असताना पहिल्या दोन प्रयत्नांत ते अपयशी ठरले तसेच तिसऱ्या वेळेस अंतिम मुलाखतीदरम्यान अपयश आले. शेवटी २००३ साली एमपीएससीचा अभ्यास करून क्लास २ मध्ये सिलेक्शन झालं. ११ मे २००५ रोजी यूपीएससी पास होऊन अंतिम निकाल आला त्यावेळी तुकाराम मुंढे यांची भारतातील रँक २० होती. हा प्रवास नक्कीच खडतर होता परंतु जास्त लक्ष केंद्रित करून योग्य नियोजनाद्वारे ते इथपर्यंत पोहोचले.

परंतु हा माणूस राजकारण्यांना पचवणं जड का जातो, वारंवार बदली का करावी लागते?

  • १४ वर्षांच्या कालावधीत १३ वेळा बदली झालेले तुकाराम मुंढे पूर्णतः शाकाहारी आहेत. मांसाहार खात असूनसुद्धा त्यांनी अधिकारी झाल्यानंतर मांसाहार आणि बाहेरच्या हॉटेल किंवा नातेवाईकांकडे जेवायला जाणे सोडले होते कारण जर कोणाच्या आमंत्रणावर जेवायला गेलो तर साहजिकच ते स्वतःच्या फायद्यासाठी किंवा काही काम पूर्ण करण्यासाठी गळ टाकू शकतात.
  • तुकाराम मुंढे हे प्रशिक्षण कालावधीत घोडेस्वारीमध्ये देशात पहिले आले होते. त्याच कारणही त्यांनी दिलेलं होत कि गावात लहानपणी म्हशीवर बसायची सवय होती.
  • इतका मोठा अधिकारी असणारा माणूस लग्नासाठी असणाऱ्या काही अटींमुळे आलेल्या आमदार-खासदार, बिझनेसमनच्या स्थळांनी नकार दिला. ते म्हणाले होते कि वेळ आली तर बसनेही प्रवास करावा लागेल किंवा भाड्याच्या खोलीत संसार करावा लागेल. शेवटी वारकरी परंपरेचं सामान्य कुटुंबातील घरातून त्यांना स्थळ आलं आणि लग्न झालं.
  • कोणताही अधिकारी बदली होऊन आला कि स्थानिक नेतेमंडळी स्वतःची ओळख किंवा प्रलोभने दाखवून अधिकाऱ्याचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता ते आपल्या नियमांमध्ये राहून काम करू लागले. एकाने त्यांना विचारलेले होते कि आपण साधं राहत असाल पण आपली मुले चांगल्या शाळेत का शिकू नयेत. त्यावर त्यांनी त्वरित उत्तर देऊन सांगितले कि मी इथपर्यंत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकून मोठा झालोय माझी मुलं पण सरकारी शाळांमध्ये शिकून मोठे होऊ शकतात.
  • तुकाराम मुंढे हे नास्तिक आहेत परंतु इतरांच्या श्रद्धा आणि विचारांचा मान ठेवता येईल असे नास्तिक.
  • कोणाकडूनही गिफ्ट न घेणारा माणूस: कोणाकडूनही गिफ्ट घेत नाहीत एवढच काय त्यांच्या मित्राचा भाऊ ड्रायफ्रूट घेऊन आलेला दिवाळीच गिफ्ट म्हणून परंतु त्यांनी त्यास नकार दिला त्यातील एक अक्रोडसुद्धा खाण्यास त्यांनी मनाई केली.
  • कोणालाही न भिणारा म्हणूस आपल्या मोठ्या भावाला वडीलबंधू या नात्याने आदरपूर्वक भीती म्हणून घाबरतात.
  • अधिकारी झाले म्हणून दोन प्राथमिक शिक्षक त्यांना आपल्या समाजामार्फत सत्कार करावा या हेतूने आमंत्रण देण्यास आले होते. त्यांनी शांतपणे सर्व ऐकून त्यांना म्हणाले कि मी कोणत्याही एका समाजाचा अधिकारी नसून माझे जे काम आहे ते करतोय. ऑफिसच्याच दिवशी ते शिक्षक निमंत्रण द्यायला आले म्हणून त्यांनी शिक्षकांना विचारले कि आज शाळेत शिकवायला गेला नाहीत का, शिक्षक म्हणाले आजारी असल्याचे अर्ज देऊन आपणांस निमंत्रित करण्यास आलो होतो. हे ऐकून तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या शाळा असणाऱ्या ठिकाणची माहिती घेऊन संबंधित शिक्षकांवरती कारवाई करण्याचे अधिकार दिले.
नियमात बसणाऱ्या सर्वच गोष्टी पूर्ण करण्याचा दृष्टिकोन आणि शिस्तबद्ध स्वभाव इतरांना न झेपणाराच असल्यामुळे सतत त्यांची बदली केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.