Bharat vikas group BVG

श्री. हणमंतराव गायकवाड एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशातील यशस्वी उद्योजग. ज्यांना सर्व्हिस क्षेत्रातील अंबानी ओळखले जाते आणि जवळपास ७० हजार पेक्षा जास्त लोकांना त्यांनी आत्तापर्यंत रोजगार दिलेला आहे.

गायकवाड यांचा जन्म सातारा येथील रहिमतपूर या गावी झाला आणि ते सहावीत असताना त्यांचे कुटुंब कामानिमित्त पुणेला स्थलांतरित झाले. अनेक अडचणींचा सामना करत ते दहावीला ८८% गुणांनी पास झाले होते त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात डिप्लोमाला प्रवेश घेतला.


इंजिनिअरिंग करत असताना वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी शिकत असताना शिकवण्या घेणे तसेच घरांना पेंटिंग करणे अशा प्रकारची कामे करून निर्वाह केला. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर १९९४ साली ते टाटा टेलकोमध्ये शिकाऊ इंजिनिअर म्हणून रुजू झाले.

टाटा मोटर्स (टेलको) कंपनीचा आधार:


१९९७ साली गायकवाड यांनी कंपनीतील निरुपयोगी म्हणून भंगारात टाकलेल्या २.५ कोटी रुपयांच्या केबलचा सदुपयोग करून कंपनीचा मोठा खर्च वाचवला होता त्यामुळे ते कंपनीत सर्वांना परिचित झाले आणि कंपनीनेही त्यांचे कौतुक केले होते. गावातील तरुणमंडळीही त्यांच्या मागे लागून नोकरी मिळवता येईल का यासाठी प्रयत्न करत होते. परंतु सर्वांनाच नोकरी देणे शक्य नव्हते.

काहीतरी वेगळे करायचे म्हणून त्यांनी कॉलेजला असताना स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मित्रांच्या मदतीने एक संस्था काढली होती. १९९७ साली टाटा मोटर्सने इंडिका गाडीसाठी प्रोडक्शन चालू केले होते आणि त्यासाठी त्यांना हेल्पर किंवा हाऊसकिपींगची कामे असणार होती.


टाटा मॅनेजमेंटच्या सूचनेनुसार गायकवाड यांनी आपल्या भारत विकास ग्रुप (BVG) संस्थेच्या साहाय्याने आपण गावातील तरुणांना रोजगार देऊ शकतो म्हणून गावातील ८ लोकांना घेऊन टाटा टेलकोमध्येच हाऊसकिपींगची कामे सुरु केली. त्यांची धडपड आणि चांगल्या प्रकारची कामे पाहता टाटा मोटर्सने टाटा फायनान्सतर्फे गायकवाड यांच्या BVG ग्रुपला स्वच्छतेच्या उपकरणांसाठी ४० लाख रुपयांचे कर्जही दिले.

सुरुवातीला ८ लोकांनी चालू झालेले काम ३ वर्षात ३०० लोकांपर्यंत गेले. २००१ साली गायकवाड यांनी टाटा टेलकोमधील नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या ग्रुपचे काम वाढवण्यास सुरुवात केली. प्लम्बिंग, AC, कार्पेट अशा सर्व प्रकारची कामे ते घेऊ लागले. बंगलोर, चेन्नई अशा ठिकाणी त्यांनी मोठ-मोठ्या कंपनींत कामे चालू केली.

चांगल्या कामांच्या दर्जामुळे संसद भवन मेंटेन करण्याचे काम मिळाले:


हा सर्वात मोठा ब्रेक त्यांच्यासाठी होता. २००३ साली ६ लाख स्क्वेअर फुटाची बिल्डिंग तयार झाली त्यासाठी त्यांनी उत्तमप्रकारे कामे केली. हळूहळू संसदेच्या बाहेरच्या आवारातील सर्वच कामे भेटल्यामुळे बाहेरील भाग चकाचक होता आणि आतून संसद भवन चकाचक का नाहीअशा चर्चा सुरु झाल्या. म्हणून मग लोकसभा-राज्यसभा चेंबरची कामे भेटून शेवटी त्यांना सर्व संसद भावनाचेच काम मिळाले.

त्यांनी संसदेत केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर नंतर त्यांना पंतप्रधान निवास, राष्ट्र्पती भवन, सुप्रीम कोर्ट आणि हळूहळू सर्वच केंद्रातील मंत्रांच्या बंगल्याचे कंत्राट मिळू लागले. दिल्लीत BVG ग्रुपचे ९००० पेक्षा जास्त कामगार आज काम करत आहेत.


देशातील मोठ्या मंदिरांची कामे BVG ग्रुपकडे आहेत:

सिद्धिविनायक, तिरुपती बालाजी मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंजाबचे सुवर्ण मंदिर, पंढरपूर, तुळजापूर, ज्योतिबा मंदिर, जेजुरी अशी भारतातील मोठ्या २४ मंदिरांचे कंत्राट आज गायकवाड यांच्या BGV ग्रुप अंतर्गत आहेत.

महाराष्ट्रातील १०८ नंबरची ऍम्ब्युलन्स:

आपण आज राज्यभरात १०८ नंबरची ऍम्ब्युलन्स गोरगरिबांना घेऊन रस्त्यांवर धावताना पाहतो त्यासाठीची मोफत सेवा आपल्याला BVG मार्फत मिळत आहे. २५ लाखांहून अधिक लोकांना यामार्फत मदत मिळाली आहे. जवळपास १००० पेक्षा अधिक ऍम्ब्युलन्स आज महाराष्ट्रात धावत असून १५००० पेक्षा जास्त बालकांचा जन्म या १०८ नंबरच्या ऍम्ब्युलन्समध्ये झाला आहे.

मेहनत, चिकाटी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी हणमंतराव गायकवाड यांचा BVG ग्रुप संपूर्ण भारतभर कामे करत असून आता अमेरिकेतसुद्धा कामे चालू करणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.