dasgaon mahad landslidedasgaon mahad landslide

२६ जुलै २००५ रोजी जणू रायगड आणि मुंबईला पावसाने झोडून काढलेले आणि क्षणात पाणी साचून संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली. इकडे खाली रायगड आणि कोंकणात दरड, पूर, रेल्वेसेवा आणि गावा-गावांचा संपर्क तुटलेला. २००५ साली रायगडमध्ये मोबाईल आणि नेटवर्क तुरळकच. मुंबई बुडाल्यामुळे रायगडमधील परिस्थितीकडे लगेच लक्ष देता येईलच अशी वेळही नव्हती.

पावसाचा जोर वाढत चालला होता, महाडमध्ये सुद्धा सावित्री नदीने जणू रौद्ररूप धारण केलेले आणि नदी शेजारीलच दासगांव, जुई, रोहण आणो कोंडिवते भागात दरड कोसळली आणि काही कळायच्या आतच अनेक घरे दरडीखाली दबून गेली.

दरड कोसळून शेकडो घरे, संसार आणि तब्बल १७० गावकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला.

आधीच पुराचे पाणी गावात शिरले असताना स्फोट झाल्यासारखा आवाज आला. दरडीमुळे पुराचे पाणी कित्येक फूट उंच उडाले आणि एरव्ही दिसणारी घरे अचानक जमीनदोस्त झाल्यामुळे एकाच धावपळ उडाली. कदाचित बरेचसे जीव वाचवले जाऊ शकले असते परंतु मुसळधार पाऊस, काळोख, अपुरी यंत्रसामुग्री आणि साधने नसल्यामुळे ते १७० लोकांच्या जीवावर बेतले. सायंकाळी ४:१५ च्या दरम्यान दरड कोसळली.

गाव हि राहिले नाही आणि निबंध लिहिणारी मुलेसुद्धा.

पावसाचा जोर वाढला नि पूरसदृश्य स्थितीमुळे वलंग न्यू इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक श्री. राजन कुर्डूनकर यांनी शाळा लवकर सोडली होती आणि शाळेत पुन्हा येताना “माझे गाव” या विषयावरती निबंध लिहून आणायला सांगितलेला होता.

घरी जाताना निबंधासाठी मुलांनी नक्कीच आपल्या स्वतःच्या गावाची कल्पना केली असेल परंतु निसर्गापुढे कोणाचेच चालले नाही. जुई व रोहण येथील १६ मुले दरडीखाली गाडली गेली आणि त्यांच्या कल्पनेतला गाव हि राहिला नाही आणि निबंध लिहून शाळेत दाखवायला लेकरंही राहिली नाहीत.

भयंकर भूस्खलन! दरडी कोसळल्या आणि त्यांनी अक्षरशः शेकडो घरे, कित्येक संसार गिळून टाकले. या दुर्घटनेत निष्पाप १७० गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. ही केवळ आकडेवारी नाही, तर प्रत्येक आकडा म्हणजे एक स्वप्न, एक कुटुंब, एक जीवन. ज्यांनी आपले सर्वस्व गमावले, त्यांच्या वेदनांची कल्पना करणेही कठीण आहे.

“सर्व मृत्यमुखी पडलेल्या गावकऱ्यांना आणि लहान मुलांना विनम्र श्रद्धांजली!”


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.