आता तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याच्या सर्वसामान्यांकडून आलेल्या तक्रारींची राज्य सरकारने दखल घेतली आहे.
पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावातील जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.
सरकारकडे आलेल्या तक्रारी व निवेदनांचा विचार करून राज्यात सर्व जिल्ह्यात तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत सरपंच सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सभेत संबंधित विस्तार अधिकारी आणि इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेण्यात यावी. ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याच दिवशी या सभेचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.