mahesh kasar

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


रत्नागिरीतील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स कंपनीत झालेल्या दुर्घटनेत पोलादपूर तालुक्यातील चरईमधील महेश कासार या तरुणाचाही मृत्यू झाला आहे. महेशच्या मृत्यूने कासार कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली असून, तालुक्यातून हळहळ व्यक्त केली आहे.



पोलादपूर तालुक्यातील चरई येथील महेश महादेव कासार या 26 वर्षीय तरुणाचा खेड तालुक्यातील घरडा केमिकल्स कंपनीमध्ये शनिवारी (२० मार्च २०२१ रोजी) सकाळी झालेल्या दोन स्फोटात होरपळून मृत्यू झाला. मोठ्या भावाच्या लग्नानिमित्त पत्नीला चरई येथे सोडल्यानंतर महेश कामावर हजर होण्यासाठी गेला. महेशला सेकंड शिफ्टची ड्युटी असताना भर असल्याने फर्स्ट शिफ्टला बोलविण्यात आले आणि याचदरम्यान ही दुर्घटना घडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.



महाड औद्योगिक वसाहतीमधील कोप्रॉन कंपनीमध्ये काही काळ काम केल्यानंतर महेशने 2018 मध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स कंपनीमध्ये जास्त पगाराची नोकरी पत्करली. यानंतर काही महिन्यांमध्येच लग्न करून खेड भरणानाका येथील कालिकामाता मंदिराजवळील एका खोलीमध्ये संसारही थाटला होता.
 
येत्या 8 एप्रिल रोजी त्याच्या भावाचे लग्न असल्याने त्याने त्याच्या पत्नीला गुरूवारी दोन दिवसांच्या सुट्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील चरई येथील घरी आणून ठेवले आणि त्याला शनिवारी सेकंड शिफ्ट असतानाही फर्स्ट शिफ्टला कामावर बोलविल्याने महेश तातडीने कामावर रवाना झाला.
 शनिवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घरडा केमिकल्स कंपनीमध्ये दोन स्फोट झाल्याची बातमी सोशल मीडिया तसेच विविध वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आल्यानंतर पोलादपूर येथील वडील महादेव कासार व कुटुंबियांना महेशबाबत चिंता वाटू लागली. संदीप गांधी, चंद्रकांत कासार तसेच अन्य काही जणांनी तातडीने चौकशी करण्यास सुरूवात केली.
 



यावेळी चौकशी करण्यात वेळ घालविण्यापेक्षा घटनास्थळी जाण्यास प्राधान्य देण्याचे ठरल्याने ही मंडळी खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रूग्णालयामध्ये पोहोचली. तेथे कानातील बाली या दागिन्यांवरुन एक जळलेला मृतदेह महेश याचाच असल्याचे त्याचे वडील महादेव कासार यांनी ओळखले. यानंतर ते सुन्न झाले.
 
सोबतच्या लोकांनी त्यांना सावरत पोस्टमॉर्टेम करून प्रेत ताब्यात घेण्यासंदर्भातील सोपस्कार तातडीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जखमींवर उपचार तसेच मृतांचे शवविच्छेदन आदी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सायंकाचे चार वाजले आणि त्यानंतर मृतदेह पोलादपूर तालुक्यातील चरई गावातील कासारवाडी येथे रवाना झाला.
 




शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महेशचा मृतदेह चरईतील घरी आणण्यात आला. त्याच्या घरडा कंपनीतील सहकार्‍यांसह अनेक ग्रामस्थांनी महेशचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अत्यंत शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पाडले.
 
महेश कासारच्या अकाली मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्ता तरूण मुलगा अचानक गमावल्याच्या दुःखाने त्याचे वडील सुन्न झाले आहेत. दिराच्या लग्नासाठी सासरी लग्नघरातील मदतीला आलेली सूनबाई अकाली वैधव्य आल्याने रडून निपचित झाली होती. सहकारी मित्र परिवारही शोकाकूल झाला होता अन् संपूर्ण पोलादपूर तालुका हळहळला.

घरडा केमीकल्स कंपनीने मृतांच्या नातेवाईकास 55 लाख देण्याचे अश्वासन दिले शिवाय नातेवाईकास नोकरी लावण्याचे कबूल केले आहे.

महेशच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.



आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.