तो आला, त्याने हसवलं, मराठी चित्रपटाचा विनोदी बादशहा झाला आणि हलक्याच पावलांनी आपल्याला सोडूनही गेला.
पूर्वी मराठी चित्रपट सह्याद्री वाहिनीवरती लागायचे आणि जवळपास दोन दशके त्यावर अधिराज्य गाजवले ते लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्या जोडीने आणि विनोदी अचूक टायमिंगने सर्वांच्या मनात अधिराज्य गाजवले. हे दोघे म्हणजेच मराठी चित्रपट अशी व्यख्या झाली होती.
लक्ष्या २६ ऑक्टोबर १९५४ साली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्माला आला म्हणून त्याचे नाव लक्ष्मीकांत ठेवण्यात आले.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय सुरुवातीपासूनच चित्तवेधक होता आणि त्यामुळेच त्यांनी शालेय जीवनात अनेक पारितोषिके मिळवली होती.
चित्रपटाचा पहिला ब्रेक:
झोपी गेलेला जागा झाला या नाटकाची नव्याने निर्मिती होत होती आणि त्यात महेश कोठारे यांचे आई-वडील काम करत होते. आत्माराम भेंडे हे बबन प्रभूंच्या स्मृतीप्रित्यर्थ हे नाटक आणत होते आणि बबन प्रभूची भूमिका खुद्द लक्ष्मीकांत करत होते. त्यावेळीस तालीम पाहायला महेश कोठारे हे देखील आले होते आणि त्यांना लक्ष्मीकांत यांचा अभिनय भावला.
ते नवीन चित्रपट करत होते आणि त्यासाठी त्यांनी लक्ष्याला १ रुपया देऊन साईन केले. चित्रपट होता धुमधडाका साल १९८५. त्यानंतर महेश कोठारेंच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे स्थान अगदी शेवटपर्यंत राहिले.
विनोदाचा बादशहा म्हणून नावारूपास आलेला लक्ष्या गंभीर भूमिकेतही प्रेक्षकांना भावला. त्यांनी मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटही केले.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे लग्न रुही बेर्डे या अभिनेत्रीसोबत झाले होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटक सोबत केली होती परंतु त्यांचे निधन झाले. १९९६ साली लक्ष्मीकांत यांनी प्रिया बेर्डे यांच्याशी विवाह केला. दोघांनी अनेक विनोदी सिनेमे केले. त्यांना अभिनय आणि स्वानंदी हि दोन मुले आहेत.
चित्रपटात काम मिळण्याआधी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी डोअर किपरचेसुद्धा काम केले होते.
कामाच्या बाबतीत त्यांनी कधीच चाल-ढकल केली नाही. रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी वेळेवर ते सेटवरती शूटिंगला हजर राहायचे. अभिनय त्यांच्या अंगात ठासून भरलेला असायचा कि प्रत्येक भूमिका ते सहजरित्या करायचे.
लक्ष्याला एकूण ५ मोठे भाऊ त्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. त्यामुळे लहानपणी लक्ष्मीकांत बेर्डे यांना बस कंडक्टर व्हायचे होते. कारण लहान असताना त्यांना वाटायचे कि बसमधून तिकीट विक्री करून जमलेले सर्व पैसे कंडक्टर घरी घेऊन जातो.
अनेक वर्षे प्रेक्षकांना हसवत असताना लक्ष्याने किडनीविकार सर्वांपासून लपवून ठेवला आणि अखेर १६ डिसेंबर २००४ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज लक्ष्मीकांत आपल्यात नसले तरी त्यांनी केलेला अभिनय हा कायम आपल्याला हसवत राहील. लक्ष्मीकांत बेर्डे यांना मानाचा मुजरा!