नवाजुद्दीन सिद्दीकीचा मांझी नावाचा चित्रपट आपण पहिलाच असेल ज्यात २२ वर्ष डोंगर फोडून रस्ता बनविणाऱ्या माणसाची खरी कथा दाखविण्यात आली आहे. परंतु आपल्या राज्यातील रायगड जिल्ह्यात माथेरान येथे सुद्धा असाच ध्येय्यवेडा मांझी तब्बल १४ वर्षे खडकात गणपती आकारत होता.
नेरळ येथून माथेरानला घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रेनमध्ये राजाराम खडे हे मोटरमन होते. १९९८ सालापासून ते मोटरमन सेवेत रुजू होते आणि प्रत्येक फेरी मारताना त्यांना पेब किल्ल्याजवळ एक मोठा कडा दिसायचा त्यामध्ये त्यांना गणपतीचा आकार असल्याचा भास होत असायचा.
असच एके दिवशी ट्रेन चालवत असताना एक उंदीर इंजिनमध्ये घुसला आणि काही वेळातच पुन्हा बाहेर उडी मारून निघून गेला. परंतु राजाराम दादा यांना तो योगायोग किंवा दैवी संकेतच असावा असे वाटले. बेचैन होत शेवटी त्यांनी आपल्या सह कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना कड्यावरचा गणपतीची साकारण्याची इच्छा सांगितली.
सर्वानीच राजाराम दादांना साथ दिली आणि २००४ साली कड्यावरचा गणपती साकारण्याचे काम सुरु झाले. सुरुवातीला लोखंडी पत्रा व इतर साधनांच्या साहाय्याने गणपतीचे मुख साकारण्यात आले आणि तब्बल १४ वर्षांच्या कालावधीत सन २०१८ मध्ये ५२ फूट उंच कड्यावरचा गणपती पूर्ण झाला.
लोकांनासुद्धा दर्शन घेण्यात यावं म्हणून पायथ्याशी छोटंसं मंदिर आणि उंदीराची मूर्ती साकारण्यात आली. हिरव्यागार थंड असलेल्या माथेरानमधील या कड्यावरच्या गणपतीला निसर्गराजा गणपती असे नाव देण्यात आले.
गेली १४ वर्षे नोकरी सांभाळत आत्मीयतेने कड्यावरचा गणपती साकारणारे राजाराम दादा आज जरी सेवानिवृत्त झाले असले तरी आजही रंगरंगोटी आणि गणपतीची निगा राखण्याचे काम ते स्वखर्चाने करत असतात आणि कड्यावर दर्शन घ्यायला जाणारे लोक जेव्हा या विशाल वास्तूची स्तुती आणि गणरायाकडे मागणे मागतात हि खरी कमाई राजाराम दादांनी केली आहे.