श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त “तेजस्विनी पुरस्कार” व “सरस्वती भूषण पुरस्कार” वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कु. आदिती तटकरे यांनी जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारण्याचा आपला संकल्प आहे असे प्रतिपादन केले.
अँड्रॉइड मोबाईल येण्याआधीचे शालेय जीवन खूपच सुंदर होते, परंतु जसा काळ बदलत चालला आहे त्याप्रमाणे शैक्षणिक व्यवस्थाही बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
– पालकमंत्री कु. आदिती तटकरे

पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी श्रीवर्धनचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा संकल्प असल्याचे सांगून विविध सेवाभावी संस्था, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व शासनाच्या वतीने येथील शैक्षणिक संस्थांना मदत करणार असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून येथील विद्यार्थी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच विविध शासकीय उच्च पदांवर पाहायला मिळावेत,अशी अपेक्षा शेवटी व्यक्त केली.
या कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांना प्राचार्य श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते सन्मानचिन्हासह “तेजस्विनी पुरस्कार” देवून गौरविण्यात आले तर शिक्षकदिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना “सरस्वती भूषण” या पुरस्काराने स्वतः पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.