CD DeshmukhChintamanrao des hmukh

डॉक्टर ऑफ सायन्स, संस्कृत भाषेचे पंडित, त्यांच्या यशाबद्दल स्वतः राम गणेश गडकरींनी कविता रचली, खुद्द लोकमान्य टिळकांनी त्यांना सरकारी सेवेत राहून देशाची सेवा करण्याचा सल्ला दिला, त्यांच्या उत्तम प्रशासकीय सेवेसाठी इंग्लंडच्या राजाने त्यांना सर हा किताब बहाल केला असे अर्थशास्रज्ञ रायगडचे सुपुत्र चिंतामण द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख यांचा २ ऑक्टोबर स्मृतिदिन. त्यांच्याविषयी जितके लिहावे तितके कमीच एवढे असे हे महान व्यक्तिमत्व आज आपल्या मातीत जन्मले तरी त्यांना आपण आज दुर्लक्षित केलेले आहे हे आपले दुर्दैव!

सी. डी. देशमुख यांचे बालपण:

cd-deshmukh-parents

त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील नाते या गावी १४ जानेवारी १८९६ रोजी मकरसंक्रांती दिवशी झाला. वडील द्वारकानाथ देशमुख वकिलीसाठी महाड येथेच बिऱ्हाड घेऊन चांगले नाव कमावले. आई गृहिणी असली तरी धार्मिक आणि हुशार होत्या. पावसाळ्यात सावित्री नदीला पूर येऊन रस्ते पाण्याखाली जायचे म्हणून त्यांचे वडील आपले बिऱ्हाड तळा येथे हलवायचे.

चिंतामणला वयाच्या ४ थ्या वर्षीच महाड येथे प्राथमिक शाळेत घातले त्यावेळी लहान वयातच ३०० श्लोक पाठ झाले होते. चिंतामण पाठोपाठ पंढरीनाथ हा भाऊ जन्मल्यामुळे व आईला त्रास होऊ नये म्हणून चिंतामणची रवानगी तळा येथे करण्यात आली. नंतर वडिलांचीच बदली रोहा येथे झाल्यामुळे बिऱ्हाड रोहा येथेच स्थलांतरित झाले. तेव्हा कुंडलिका आणि गंगा नदीवर पूल नसल्यामुळे रोहा गाव एक प्रकारचे बेट होते.

अलौकिक स्मरणशक्ती:
लहान वयातच ३०० श्लोक पाठ असणाऱ्या चिंतामणने बुद्धीसामर्थ्यावर यश व कीर्ती मिळवली. रोहा ते अलिबाग बोटीने प्रवास करून स्कॉलरशिपची परीक्षा दिली. ती परीक्षा पास झाल्यामुळे १९०७ च्या अखेरीस चिंतामणला कुटुंबीयांनी पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे हलवले.

चिंतामणने वयाच्या १४ व्या वर्षीच मॅट्रीकचा अभ्यास पूर्ण केला होता परंतु त्यावेळेस वयाची सोळा वर्षे झाल्याशिवाय मॅट्रिक (दहावी) परीक्षा देता येत नसे. मग त्या २ वर्षात संस्कृत आणि इंग्लिश भाषेत प्रभुत्व मिळवले. १९१२ साली निकाल लागला तेव्हा चिंतामण मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला आला होता. त्यामुळेच जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती मिळाली आणि चिंतामण मुंबईतील नामांकित एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. चिंतामणच्या याच यशाला उद्देशून कवी राम गणेश गडकरी यांनी ‘अभिनंदनपर वर्धापन’ हे काव्य लिहिले.

एल्फिन्स्टन कॉलेजमधून इंटर्न झाल्यानंतर इंग्लंड येथील केम्ब्रिज विद्यापीठात बी. ए. उत्तीर्ण होऊन आता चिंतामणचा चिंतामणराव झाला होता.

जबर वाचन, आत्मविश्वास आणि अध्ययनाची विलक्षण आवड असल्याने चिंतामणरावांनी एकेक क्षेत्र काबीज केले. आय.सी.एस. परीक्षेत तर ते प्रथम आलेच परंतु त्यांना जेवढे गुण मिळाले तेवढे नंतर कोणालाच मिळवता आले नाहीत. कुशाग्र बुद्धी आणि शिस्तबद्ध काम यामुळे त्यांची सर्वांवरच मोहिनी पडली होती. आधी शिक्षण खात्याचे सचिव व त्यानंतर वित्त व आरोग्य या खात्यांचे विशेष अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

लंडन येथील घराला त्यांनी रोहा असे नाव दिले होते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर:

CD Deshmukh

१९३५ साली ब्रिटिशांनी भारतात रिझर्व्ह बँक स्थापन केली आणि बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे ठेवले. ब्रिटिशांच्या राजवटीत कोणा भारतीयाला उच्च स्थान मिळणे अवघडच पण सी. डी. देशमुख त्यास अपवाद ठरले. एका वर्षासाठी त्यांची रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी निवड झाली आणि त्यांच्या कामामुळे १९४१ साली सेंट्रल बोर्डाच्या मद्रास येथील बैठकीत त्यांची डेप्युटी गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली.

रिझर्व्ह बँकेचे सुरुवातीचे गव्हर्नर टेलर यांचे अचानक निधन झाले आणि सेंट्रल बोर्डाच्या निवडून आलेल्या सदस्यांनी सी. डीं. च्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे अखेरीस ११ ऑगस्ट १९४३ रोजी चिंतामणराव देशमुख रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

चिंतामणराव गव्हर्नर झाले तेव्हा आपली असणारी सहीच्या दोन रुपयांच्या ०००००१ क्रमांकाची नोट रोहा येथे येऊन आईच्या चरणी अर्पण केली.

चलन निधी व जागतिक बँक यावर यशस्वी प्रशासक म्हणून त्यांनी काम केले. १९५० ते १९५६ काळात आंतरराष्ट्रीय व जागतिक बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. अशा माणसाला आपल्या देशात सन्मानाने ठेवण्यासाठी जगातील अनेक देश एका पायावर तयार होते परंतु त्यांनी भारतातच राहून देशसेवा केली.

cd-deahmukh-sign-on-ten-rupees-note

त्यांनी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण, LIC चे राष्ट्रीयकरण, स्टेट बँक ऑफ इंडिया राष्ट्रीय विकास परिषेदेची स्थापना अशा प्रकारचे निर्णय घेऊन भारतातील नियोजनबद्ध विकासाचा पाया घातला.

१९५२ ची लोकसभा निवडणूक:

cd deshmukh with nehru and wife durgabai

स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक १९५२ ला घेण्यात आली होती. १९४७ ला भारताच्या स्वातंतत्र्यानंतर चिंतामणराव भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून राज्यसभेवर पंजाबच्या जागेवरून निवड झालेले होते. परंतु तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू यांना सर्व कॅबिनेट मंत्री लोकांनी निवडून दिलेले असावेत म्हणून सीडींना पुन्हा वित्तमंत्री करण्यासाठी लोकसभेची उमेदवारी दिली.

कुलाबा (आताचा रायगड) मतदार संघातून ते भाऊसाहेब राऊत यांच्या विरुद्ध निवडून आले. कुलाबा मतदार संघात तेव्हा ५०% मतदान म्हणजेच १,८०,००० मतदारांनी मतदान केले होते. त्यात १,१०,००० मते सीडींना व ७०,००० मते भाऊसाहेब राऊत यांना मिळालेली होती.

मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा:

१९५६ साली भाषावार प्रांतरचना होत असताना महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये न करता मुंबईच द्विभाषेचे राज्य असावे असा प्रस्ताव केंद्र सरकारने केला होता. मुळात रिझर्व्ह बँक, स्टेट बँक, LIC अशा अनेक प्रकारच्या आर्थिक संस्थांची मुख्यालये मुंबईत ठेवून मुंबई देशाची आर्थिक राजधानी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

संयुक्त महाराष्ट्राचा लढासुद्धा पेटला होता दोन आठवड्यात १०५ जणांनी हुतात्म्य पत्करले होते. अशातच सीडींनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचे ठरविले. राजीनामा दिल्यानंतर १९५५ ते १९८२ या २६ वर्षांच्या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष आणि दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू हि पदे भूषवली.

तळा येथे आल्यानंतर जीवनचरित्र लिहिण्याचे ठरले:

tala-school-remark
तळा येथे आल्यानंतर आपल्या शाळेला दिलेला शेरा.

२५ ऑक्टोबर १९७० रोजी सकाळी ९:०० वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी सी. डी. देशमुख सपत्नीक तळा शहरात एका नियोजित बंधाऱ्याचा भूमिपूजनासाठी आले होते. आपले बालपण घालवलेल्या तळा येथील घरात ते आपल्या पत्नीला आपल्या बालपणाच्या आठवणी हावभाव करत वर्णन करून सांगत होते. त्याचवेळी त्यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख यांनी त्यांना आत्मचरित्र लिहिण्याचे सुचवले. ३ वर्षे मेहनत करून आपल्या जुन्या डायऱ्या काढून १९७४ साली “द कोर्स ऑफ माय लाईफ” हे जीवनचरित्र १९७४ सालात प्रसिद्ध केले.

जीवनचरित्रामुळेच सी. डी. पुन्हा प्रकाश झोतात आले आणि २५ जानेवारी १९७५ रोजी त्यांना पद्मवीभूषण हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही ते उभे राहिले होते परंतु महाराष्ट्रातच कमी मते पडल्याने त्यांचा पराभव झाला आणि हा बुद्धिवंत शेवटी आंध्रप्रदेशमध्येच विसावला. २ ऑक्टोबर १९८२ रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.