उतेखोल/माणगांव, दि.१३ मे ( रविंद्र कुवेसकर )
वाहतुक कोंडीस कोण जबाबदार यापेक्षा आता ही कोंडी कोण फोडणार हे महत्त्वपूर्ण
माणगांव मधिल वाहतुक कोंडीने आता सर्वांची पूरती कोंडी झालीय, नगरपंचायतीने वाहतुक कोंडीचे कारणास्तव अनधिकृत बांधकाम हटविली. त्यानंतर प्रश्न सुटण्या ऐवजी आता तर माणगांव मधिल महामार्ग सोडाच, सर्वच अंतर्गत रस्त्यांवर वाहतुक कोंडीत प्रचंड वाढ का झाली आहे. यासाठी नगरपंचायत काय उपाय योजना करणार? असा सवाल ऐरणीवर आलाय. येथील लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होतयं हे कुणी सांगण्याची गरजच नाही, ते नागवे सत्य सर्वांसमक्ष आहे.माणगांव मधिल मोर्बा रस्त्यावरून नुकतेच आपल्या दुचाकीने जाणारा एकजण व पायी चालत जाणारे दांपत्य यांना पाठीमागुन येऊन अनपेक्षित जोरदार धडक, काळाची झडप असा भयंकर अपघात आपण सर्वांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिला.
मन छिन्नविछिन्न करणारी दुर्दैवी घटना घटली, याची नंतर कारण मिंमास करुन नुसता प्रक्षोभ करुन पुन्हा परिस्थिती जैसे थे! यावर नियोजनबद्ध कायमस्वरूपी त्वरित उपाय योजना हवी, अपघाती गमावलेला जीव पुन्हा येणार नाही. पण पुन्हा असेच घडू नये याचा विचार, नियोजन तात्काळ करणे गरजेचे आहे.यासाठी माणगांव मधिल मोर्बा रोड अर्थात पुणे दिघी रोडवरील बाजारपेठ व वर्दळीच्या हद्दीतील फूटपाथी महामार्ग रस्ता यांच्यामध्ये मजबूत लोखंडी अथवा स्टीलचे संरक्षक पाईप रेलिंग (गर्डर) उभे करुन पादचाऱ्यांना फक्त फूटपाथवरुनच येथून वर्दळ करण्यास सक्तीचे केल्यास अपघात होणार नाहीत. या रस्त्यावर आपली दुचाकी वाहने उभी करुन लोक चुकीच्या पध्दतीत बाजारहाट करणार नाहीत, यासाठी माणगांव नगरपंचायतीने तातडीने लक्ष वेधावे, केवळ अनाधिकृत बांधकामे हटवून समस्या सुटलेली नाही.
महामार्ग समस्या सुटेल तेंव्हा सुटेल! पण काळ सोकावता कामा नये! ठोस उपाय योजना हवी. वाहतुक पोलीस व स्थानिक पोलीस यांनीही येथील जनतेस रस्त्यावर वाहने उभी न करता केवळ पार्किंग झोन मध्येच ती वाहने उभी करण्याच्या सुचना देऊन लोकांना बाजारहाट करता येईल असे शिस्तबद्ध नियोजन केल्यास काही प्रमाणात का होईना येथील ट्रॅफिक नियंत्रणात येईल असे मत अनेक जाणकारांकडून व्यक्त होत जनतेमधुन देखील तिच मागणी होत आहे. येथील लोकप्रतिनीधी आपल्या स्वसंरक्षणार्थ महागड्या गाड्यांतून याच रस्त्यावर गेली अनेक वर्ष प्रवास करतात. सत्तेत राहुन समाजसेवा करतात मग याच रस्त्यावर ते पुन्हा पुन्हा कसली पहाणी आणि दौरे तसेच कानउघाडनी करतात? समस्या ज्ञात असताना त्यावर ठोस उपाय योजनांसाठी आजवर यांनी केलेल्या कामांमुळे जनतेला अर्थात त्यांच्या मतदारांना किती फायदा झाला? सवाल आता ऐरणीवर आला आहे.
येथील जनता आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणत गप्पगार संवेदनाहीन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशी राम भरोसे अवस्था केवळ कोकणवासियांचीच नव्हे तर येथून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच प्रवाशांची झाली आहे. कुणाचा कधी, कुठे, कसा जीवघेणा अपघात होईल याचा नेम उरला नाही. इतकी गंभीर समस्या आणि वाहतुक कोंडीतून जनतेची प्रदिर्घ कुचंबणा महामार्गावर सुरु आहे.एखादा दुर्दैवी अपघात अथवा दुर्घटनेनंतर काही दिवस जनप्रक्षोभ, प्रतिक्रिया, तात्पूरती मलमपट्टी, डागडुज्जी, महामार्गाची चिघळती जखम भरण्याचा दिखाऊ स्वार्थी उदरभरणी खड्डेभरु प्रयत्न, दरवर्षीच श्रीगणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमानी कोकणवासीयांची फक्त सहानुभूती जतन करतानाचे चित्र, पहाणी दौरे होतात.
केंद्रीय मंत्र्यांची तिच तीच आश्वासन आणि त्यांनीच तपासुन शासन निविदा काढून नेमलेले ठेकेदार, संबंधित अधिकारी यांची आधिच ठरल्या प्रमाणे नुसतीच कुचकामी कान उघाडनी, झाडाझडती करुन आपण याविषयी किती गंभीर आहोत? हे जनतेला भासविण्याचा प्रयत्न कशापायी होत आहे. त्याच त्याच बातम्या दिसून येतात. पुन्हा परिस्थिती जैसे थे, येरे माझ्या मागल्या! असच सध्या मुंबई गोवा महामार्ग आणि येथील ट्रॅफिक जॅम, हे रोज मरे त्याला कोण रडे? अस काहीस चित्र सुरु आहे.
रायगडचे लोकप्रिय खासदार, सर्व आमदार आणि दोन दोन कॅबिनेट मंत्री एवढी मोठी तथाकथित ताकद येथे असताना देखील या गंभीर समस्यांवर अभ्यासपूर्ण तोडगा निघत नाही ! हे अहो आश्चर्यमच! म्हटले जात आहे. अशा कठीणकाळी जिल्ह्याचे पालकत्व कोण घेणार? तुमचे आमचे दुर्दैवच आणि दूसरे म्हणावे तरी काय? असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.फोटो :माणगांव मधिल नित्याच्या याच त्या वाहतुक कोंडीने सर्वच गलितगात्र, ठोस उपाय नाही जनतेच्या माथी कायमच वनवास परिस्थिती जैसे थे प्रवासी जनतेसह माणगांवकर त्रस्त.