दापोली तालुक्यातील येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील ३ विद्यार्थ्यानी शारिरिक व मानसिक छळ करून रॅगिंग केल्याची तक्रार या विद्यार्थ्याने या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचेकडे केली आहे.
दापोलीच्या कृषी महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या ११ विद्यार्थ्यांचा एक गट रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एका गावात कार्यरत होता. या गटातील एका विद्यार्थ्याला इतर तीन सहकारी त्रास देत होते. या विद्यार्थ्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास असल्याने त्याने याबाबत कोणालाही काही सांगितले नाही.
या तीन सहकारी मित्रांनी प्रशिक्षण घेत असताना तिसऱ्या दिवसापासून या विद्यार्थ्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. यात त्याला अन्य सहकाऱ्यांच्या समोर अंतर्वस्त्रावर नाचायला लावणे, रात्री उंट होण्यास सांगून चादर अंगावर टाकून मारहाण करणे, आणि दारू पाजून गुप्तांगाला दोरी बांधून त्रास देणे यांचा समावेश होता. या विद्यार्थ्याने कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत या सर्व घटनांचा उल्लेख केला आहे.
या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने सर्व ११ विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली व मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे या विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी दोघांना रत्नागिरी जिल्ह्यातील एका तालुक्यात तर अन्य एकाला रायगडमध्ये दुस-या केंद्रावर पाठवण्यात आले असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांनी दिली.
या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे ही डॉ. जोशी यांनी सांगितले. पहिल्या समितीने रॅगिंगसंदर्भात अहवाल दिल्यास दुस-या समितीची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापकांसह पोलीस अधिकारी, स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी, तहसीलदार यांचाही समावेश असणार आहे. त्यामध्ये रॅगिंग झाल्याचे निश्चित झाल्यानंतर रॅगिंगप्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group